
वाशिम जिल्हा प्रतिनिधि (सुधीर ढगे) : मौजे चिखली ता. मानोरा जि. वाशीम येथे नापनी व्यवस्थापन योजनेअंतर्गत नाल्यावर सुरू असलेल्या पूरसंरक्षण भिंतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा गंभीर आरोप करत गावकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार चिखली गावकरी मंडळींनी सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे की, गावालगत वाहणाऱ्या नाल्यावर पूरसंरक्षण भिंतीचे काम सुरू असून कंत्राटदाराकडून मुरूम-माती मिसळलेले दगड, निकृष्ट साहित्य वापरले जात आहे. भिंतीचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसून कामाचा फलकही लावण्यात आलेला नाही, तसेच अंदाजपत्रकाची प्रत मागणी करूनही गावकऱ्यांना देण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
गावकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले की, पावसाळ्यात या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी येते व ते पाणी गावात शिरून नागरिकांचे मोठे नुकसान होत असते. शासनाने यासाठी संरक्षण भिंत मंजूर केली असली, तरी कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होत असून भिंत मजबूत न झाल्यास गावकऱ्यांना भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
याशिवाय नाल्यालगतचा जिल्हा ग्रामीण मार्ग असून भिंतीचे काम रस्त्यालगत केल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे आणि वाहतूक धोक्यात आली आहे, असेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तक्रारीनंतरही कंत्राटदाराने कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, सुरू असलेले काम तांत्रिकदृष्ट्या तपासून निकृष्ट दर्जाचे काम थांबवून पुनःदुरुस्ती करावी. ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसह मा. मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, कारंजा तहसीलदार, मानोरा यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे. गावकरी मंडळींचे म्हणणे आहे की, “संरक्षण भिंतीचे काम गावाला वाचवण्यासाठी आहे, परंतु कामाचा दर्जा पाहता धोका अधिक वाढत आहे. शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा.”



