महिला समुपदेशन केंद्रात सपोनि शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय जनजागृती कार्यशाळा
सिल्लोड | प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
सिल्लोड येथे पोलिस रायझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांना सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात सायबर क्राईम व कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये वैयक्तिक सुरक्षितता, शारीरिक सीमा आणि योग्य-अयोग्य स्पर्शाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सिल्लोड शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने महिला समुपदेशन केंद्र, सिल्लोड येथे “गुड टच–बॅड टच” विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच यामधील फरक, स्वतःची सुरक्षितता कशी जपावी, कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनास सामोरे गेल्यास काय करावे, तक्रार कशी नोंदवावी याबाबत सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. मुलांनी कोणत्याही भीतीशिवाय आपले अनुभव व प्रश्न मांडावेत, तसेच अडचणीच्या प्रसंगी पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी विशाल पाईकराव यांच्या कडून करण्यात आले.
कार्यक्रमात सपोनि शेषराव उदार, सपोनि ज्ञानेश्वर कायदे, समाधान भागिले, तळेकर आण्णा,आनंद पगारे, कल्पना बनकर (समुपदेशक) तसेच महिला समुपदेशन केंद्राचे प्रमुख विशाल पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मानसिक धैर्य, आत्मविश्वास व कायदेशीर अधिकारांची माहिती देत मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून सुरक्षिततेबाबत सजगता निर्माण झाली असून, अशा प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. महिला समुपदेशन केंद्र व सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.






