छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सावळदबारा शाखेत यादी प्रसिद्ध; आपले सरकार सेवा केंद्रावर आधार कार्ड, कर्ज खातेक्रमांक व फार्मर आयडीसह प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा, येथे महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिली पात्र लाभार्थी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली असून ती महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सावळदबारा शाखेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत, त्यांनी तातडीने आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रशांत फुसे यांनी केले आहे.
आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड, कर्जाचा विशिष्ट खातेक्रमांक (Loan Account Number) तसेच फार्मर आयडी सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध नसेल, त्यांनी तो आपले सरकार सेवा केंद्रावर त्वरित तयार करून त्यानंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असेही सांगण्यात आले आहे.
प्रमाणीकरण करताना नाव, आधार क्रमांक व कर्ज खातेक्रमांक यांची काळजीपूर्वक शहानिशा करूनच प्रक्रिया पूर्ण करावी, असे शाखा व्यवस्थापक प्रशांत फुसे यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाकडून प्रसिद्ध झालेल्या यादीतील सर्व शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेची पडताळणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयामार्फत बँकेच्या नोंदींशी करण्यात आली असून, कर्ज रकमेबाबत शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट झालेली नाहीत, त्यांची पात्रतेनुसार पुढील याद्यांमध्ये नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
सावळदबारा शाखेच्या सर्व ग्राहकांनी कर्जमाफीची प्रक्रिया सुरळीत व यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन शाखा व्यवस्थापक प्रशांत फुसे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सावळदबारा शाखेतील योजनेचे अधिकारी प्रशांत फुसे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






