छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
चौसाळा महसूल मंडळातील हिंगणी बुद्रुक येथे गुरुवारी (१ जानेवारी) २०२६ मंडळस्तरीय महसूल आढावा बैठक घेण्यात आली. “शासन आपल्या दारी” या संकल्पनेनुसार महसूल प्रशासनाने थेट गावपातळीवर येत शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या बैठकीत महसूल दाखले, जमीन नोंदी, वारसा हक्क, फेरफार, शेतीविषयक अडचणी, पीकविमा, अॅग्रीस्टॅक तसेच विविध शासकीय योजनांबाबत नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रत्येक प्रश्नाची दखल घेत काही प्रकरणांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले, तर उर्वरित प्रकरणांबाबत आवश्यक कागदपत्रांनंतर निराकरणाचे आश्वासन दिले.
या बैठकीत “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत विविध प्रमाणपत्रे, दाखले, श्रावण बाळ योजनेचे लाभपत्र, कुणबी व डोमेसाइल प्रमाणपत्र तसेच फार्मर आयडीचे वितरण करण्यात आले. यामुळे नागरिकांना तालुका किंवा जिल्हा कार्यालयात जाण्याची गरज भासली नाही.
बैठकीला मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन थेट गावात आल्याने समस्या मांडण्यास सुलभता मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.






