Home / Uncategorized / मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त शेंदुर्णीत जागतिक क्रीडा दिन उत्साहात…

मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त शेंदुर्णीत जागतिक क्रीडा दिन उत्साहात…

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

आप्पासाहेब आर. बी. गरुड महाविद्यालयात व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन; ३० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

जामनेर तालुक्यातीलशेंदुर्णी येथील आप्पासाहेब आर. बी. गरुड महाविद्यालयाच्या मैदानावर हॉकीचे जादूगार व महान भारतीय खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त १५ वा जागतिक क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. शेळके डॉ महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद, सोयगाव येथे कार्यरत असलेले शिक्षक विशाल निकम उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तुषार चौधरी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राचे महत्त्व, खेळातून होणारे शारीरिक व मानसिक फायदे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडांचे योगदान याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेण्याची गरज व्यक्त केली. नियमित खेळामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच आत्मविश्वास, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन करण्यात आले.

क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत एकूण तीन संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत सुमारे ३० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सामन्यांमध्ये चुरस निर्माण केली. मैदानावर झालेल्या या सामन्यांना महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांनी स्पर्धेचा उत्साह वाढविला.

मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता. देशाच्या क्रीडा इतिहासात मेजर ध्यानचंद यांनी आपल्या असामान्य हॉकी कौशल्याने भारताचे नाव जगभर पोहोचविले. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात क्रीडा दिन साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने महाविद्यालयात विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. महेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनातून व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

क्रीडा दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता निर्माण होऊन खेळाडूवृत्तीला चालना मिळाली. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.याप्रसंगी शिक्षक, मान्यवर, शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सुद्धा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदिच्छा व्यक्त केला अशी माहिती प्रा डॉ महेश पाटील यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार