Home / Uncategorized / बळी राज्याला आधी निसर्गाने झोडपले; आता महावितरणचा हातोडा..!

बळी राज्याला आधी निसर्गाने झोडपले; आता महावितरणचा हातोडा..!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

पावसाने दडी मारल्याने पिके सुकली; वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे शेतकरी हैराण — चार-चार तास शेतात थांबूनही वीज गायब

सोयगाव : तालुक्यातील सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरूच असून, आधी पावसाने दडी मारल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर असताना आता महावितरण कंपनीच्या अनियमित वीजपुरवठ्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. गेल्या महिनाभरापासून परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन, कापूस, मका यासह विविध पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीत विहिरींमध्ये उपलब्ध असलेल्या थोड्याफार पाण्यावर पिके वाचविण्याची धडपड सुरू असताना वीजपुरवठाच सुरळीत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सावळदबारा परिसरात पावसाने मोठी ओढ दिल्याने नदी, नाले, पाझर तलाव अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पावसाच्या पाण्याची मोठी प्रतीक्षा आहे. डाभा, मोलखेडा, हिवरी, टिटवी, पळसखेडा, चारुतांडा, देव्हारी, पिंपळवाडी, महालबदा, घाणेगाव तांडा, नादांतांडा, सावळदबारा आदी परिसरातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत.

निसर्गाने मारले, आता महावितरणचा मार!

एकीकडे पावसाने साथ सोडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पिके डोळ्यांसमोर सुकताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरींमध्ये थोडेफार पाणी उपलब्ध आहे, ते पिकांना पाणी देऊन उभे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा सुरळीत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे.

शेतकरी रात्री-अपरात्री शेतात जाऊन वीज येण्याची वाट पाहत आहेत. चार-चार तास शेतात थांबल्यानंतरही वीज येत नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. वीज आली तरी काही वेळातच गायब होते. वीजपुरवठ्याचा हा लपंडाव दिवसेंदिवस वाढत असून, शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटण्याच्या मार्गावर आहे.

सावळदबारा येथील ३३ केव्ही उपकेंद्र असूनही ‘खेळखंडोबा’

सावळदबारा येथे महावितरण कंपनीचे ३३ केव्ही उपकेंद्र असतानाही परिसरातील वीजपुरवठ्याची अवस्था अत्यंत खराब असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उपकेंद्र असूनही वीजपुरवठा सुरळीत का होत नाही, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. वीज कधी येते आणि कधी जाते याचा भरवसा राहिलेला नाही.

शेतकरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनेकदा समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप आहे. काही वेळा ‘तुमचा वेळ झाला आहे, आता वीज उद्या सकाळी येईल’ असे सांगण्यात येते. सकाळी पुन्हा संपर्क साधला असता परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधित अभियंत्यांकडून फोनला प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला आहे.

कोरडवाहू पिके हातातून गेली; उरलेली पिके तरी वाचवा!

पावसाअभावी कोरडवाहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातून सोयाबीन, मका, कापूस यासारखी पिके निघून जाण्याची वेळ आली आहे. मात्र ज्यांच्याकडे विहीर, बोअरवेल किंवा अन्य सिंचनाची थोडीफार सुविधा आहे, ते शेतकरी उपलब्ध पाण्यावर पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अशा शेतकऱ्यांना किमान काही तास तरी सलग वीजपुरवठा मिळाल्यास पिकांना पाणी देता येईल आणि काही प्रमाणात उत्पादन वाचविता येईल. मात्र वीजपुरवठाच खंडित होत असल्याने उपलब्ध पाण्याचा उपयोग करणेही कठीण झाले आहे.

▪️‘किमान पाच तास सुरळीत वीज द्या’

“निसर्गाने आधीच शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. पावसाअभावी कोरडवाहू पिके हातातून गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीचे थोडेफार पाणी आहे, त्यांना पिके वाचविण्याची संधी तरी मिळावी. त्यासाठी किमान पाच तास सलग व सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा. चार-चार तास शेतात थांबूनही वीज मिळत नसेल तर शेतकरी पिकांना पाणी कसे देणार?” असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गायकवाड (मोलखेडा, ता. सोयगाव) यांनी उपस्थित केला आहे.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सावळदबारा ३३ केव्ही उपकेंद्रातील वीजपुरवठ्याची तातडीने पाहणी करून समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पावसाची प्रतीक्षा आणि वीजपुरवठ्याचा लपंडाव यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन व महावितरणने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार