छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
निळकंठेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या भंडाऱ्यात स्वयंपाक सेवेत सहभाग; बुंदी काढत दिला सेवाभावाचा संदेश…
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील निळकंठेश्वर महादेव मंदिर संस्थान, तपोवन निल्लोड येथे सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याला भक्तिभावाचे व सेवाभावाचे स्वरूप प्राप्त झाले. या भंडाऱ्याच्या निमित्ताने राज्य मंत्री दर्जाप्राप्त तथा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी स्वतः स्वयंपाकाच्या सेवेत सहभागी होत भाविकांसाठी बुंदी काढण्याचे कार्य केले. त्यांच्या या साधेपणाने आणि सेवाभावाने उपस्थित भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
धार्मिक कार्यक्रमांमध्ये केवळ उपस्थिती नोंदविण्याऐवजी प्रत्यक्ष सेवाकार्यात सहभागी होण्याचा आदर्श राज्य मंत्री दर्जा प्राप्त इद्रिस मुलतानी यांनी यावेळी घालून दिला. निळकंठेश्वर महादेव मंदिर संस्थान, तपोवन निल्लोड येथे आयोजित भंडाऱ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. भाविकांसाठी प्रसादाची तयारी सुरू असताना मुलतानी यांनी स्वयंपाकाच्या ठिकाणी जाऊन सेवाकार्यात हातभार लावला.
भंडाऱ्याच्या निमित्ताने भक्तांच्या सेवेसाठी योगदान देता आले, याचा मनस्वी आनंद असल्याची भावना इद्रिस मुलतानी यांनी व्यक्त केली. ‘भक्तांची सेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून त्यांनी या सेवाकार्यात सहभाग घेतला. स्वतः हाताने बुंदी काढत त्यांनी सहकाऱ्यांसोबत काम केले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित भाविकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
निळकंठेश्वर महादेव मंदिर संस्थान, तपोवन निल्लोड येथे विविध धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याची परंपरा जपली जात आहे. सालाबादप्रमाणे यंदाही भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्यात परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
राज्यमंत्री दर्जा प्राप्त असतानाही कोणताही मोठेपणाचा आव न आणता सामान्य सेवकाप्रमाणे स्वयंपाकाच्या कामात सहभागी झालेल्या इद्रिस मुलतानी यांच्या या भूमिकेचे उपस्थित भाविकांनी कौतुक केले. धार्मिक स्थळी सेवा करण्याची संधी मिळणे हीच आपल्यासाठी मोठी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
भंडाऱ्यात भाविकांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या इद्रिस मुलतानी यांच्या साधेपणाची आणि सेवाभावाची परिसरात चर्चा रंगली असून, त्यांच्या या कृतीने उपस्थितांची मने जिंकली.






