Home / Uncategorized / पोळा-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पहूर स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक…

पोळा-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पहूर स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक…

जळगाव प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

उत्सव उत्साहात साजरे करा; कायदा हातात घेऊ नका — सपोनि प्रवीण दात्रे यांचे आवाहन 

पहूर, ता. जामनेर : आगामी पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पहूर व परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सण-उत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावेत, यासाठी पहूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सपोनि प्रवीण दात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

यावेळी मार्गदर्शन करताना सपोनि प्रवीण दात्रे यांनी “सण-उत्सव आनंदाने आणि उत्साहात साजरे करा; मात्र कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका,” असे आवाहन केले. उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा, शांतता आणि बंधुभाव कायम ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळांकडून मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ध्वनिक्षेपकांचा वापर केला जातो. या सर्व बाबींमध्ये शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची विशेष दक्षता मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे दात्रे यांनी सांगितले.

अफवा व गैरसमज टाळण्याचे आवाहन

सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा, चुकीचे संदेश किंवा गैरसमज यामुळे अनेकदा किरकोळ बाबींवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता नागरिकांनी संयम बाळगावा. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांची माहिती मिळाल्यास त्याची तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पहूर पोलिस प्रशासनाने केले.

उत्सवाच्या काळात मद्यपान करून धिंगाणा घालणे, विनाकारण वाद निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे अथवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला. कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती मिळाल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता तत्काळ पहूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलीस निरीक्षक दात्रे यांनी स्पष्ट केले.

पोलीस प्रशासनाकडून सहकार्याचे आश्वासन

गणेश मंडळांनी उत्सवाच्या आयोजनासाठी आवश्यक परवानग्या व नियमांची पूर्तता करावी. मिरवणुकीचे मार्ग, वेळ, ध्वनिक्षेपकांचा वापर, वाहतूक व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असेही बैठकीत सांगण्यात आले. उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पहूर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

बैठकीस पोलीस पाटील, विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व समाजघटकांनी परस्पर सहकार्य, संयम आणि बंधुभाव जपत पोळा व गणेशोत्सव साजरा करावा आणि पहूरच्या शांततेची व सामाजिक सलोख्याची परंपरा कायम राखावी, असा सूर बैठकीत उमटला.

“उत्सव आपला; जबाबदारीही आपलीच”

सण-उत्सव हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम असून, आनंद साजरा करताना इतरांच्या भावना, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे पोळा व गणेशोत्सवाच्या काळात सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून शांतता व सलोखा राखावा, असे आवाहन पोलिस अधिकारी निरीक्षक प्रवीण दात्रे पहूर यांच्या कडून कडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार