मंगरुळपीर:( वाशिम जिल्हा प्रतिनिधी सुधीर ढगे ) जगद्गुरु रामानदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी (जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम) यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन दि. १३ डिसेंबर रोजी मंगरुळपीर येथील सांस्कृतिक भवनात भक्तिमय वातावरणात करण्यात आले.

या पावन सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थित राहून पादुकांचे दर्शन घेतले.दि. १२ डिसेंबर रोजी श्रींच्या पादुका शिवाजी पजई यांच्या निवासस्थानी आगमन झाले. त्यानंतर दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पादुका रथात विराजमान करून बिरबलनाथ महाराज मंदिरापासून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, भजन-कीर्तनात आणि कलशधारी महिलांच्या सहभागाने ही मिरवणूक सांस्कृतिक भवनापर्यंत पोहोचली.
सांस्कृतिक भवनात पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपासक दीक्षा कार्यक्रम संपन्न झाला. पादुका पूजनानंतर संस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिलाई मशिनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास माजी जि. प. अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, माजी आ. लखन मलिक, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलागे, माजी नगराध्यक्ष अशोक परळीकर, माजी जि. प. सदस्य मोहन चौधरी, मोनावाले, शेगाव पीठ प्रमुख कुंडलिकराव वैभासे, उपपीठ प्रमुख संजय खडागळे, उपव्यवस्थापक ऋषिकेश बिरारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाणी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख, जिल्हाध्यक्ष संजय सचेती, महिला जिल्हाध्यक्ष वनिता ताई राठोड, सरपंच संतोष घोडके, शिवाजी पजई, महाजन, संजय वाणी, भानुदास शिरसाठ, राजू ठाकरे, दत्ता नागरे, सतीश शेळके, विश्वास पराडे यांच्यासह असंख्य भाविकांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती चित्रफितीद्वारे उपस्थितांना देण्यात आली. यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत मोफत इंग्रजी माध्यमाच्या शाळा व वेदपाठशाळा, मोफत वैद्यकीय दवाखाने, रक्तदान शिबिरे, मरणोत्तर देहदान व अवयवदान (आतापर्यंत १६३ देहदान व ९० हून अधिक अवयवदान), तसेच महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर ५३ मोफत रुग्णवाहिका २४ तास अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.
महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र व घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, तसेच यावर्षी जानेवारी महिन्यात अवघ्या १५ दिवसांत १,३६,२७० रक्तकुपिकांचे संकलन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. “ब्लड इन नीड” व “एक पेड़ माँ के नाम” या उपक्रमांतर्गत नोव्हेंबर २०२५ मध्ये १,१०,६८७ वृक्षांचे रोपण करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यानंतर प्रवचनकार सरिता भागवत यांचे प्रेरणादायी प्रवचन झाले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिभाव, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाच्या वातावरणात उत्साहात पार पडला.







