
चिखली :- भारतीय जनता पक्षाच्या विकासकार्यांवर समाधान व्यक्त करत अखिल भारतीय धनगर समाजाने चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार पंडितराव देशमुख यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास व योजनांवर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे समाजनेत्यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या निवेदनात सांगण्यात आले आहे की
हिंदू धर्म रक्षणासाठी, इतिहासातील आदर्श व्यक्तिमत्त्व अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे सरकारने केलेले जतन व जागतिक स्तरावर केलेले गौरवीकरण हे धनगर समाजासाठी अभिमानाचे आहे. चिखली शहरात त्यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देणे, बस स्टँडजवळ स्थळ निश्चित करणे, तसेच मंदिरांमध्ये नित्यपूजेची व्यवस्था निर्माण करणे या भाजपा शासनाच्या निर्णयांना समाजाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
देशभरात नर्मदा जयंती, निळवंडा जयंती, व चारोळी ज्योतिर्लिंग पूजेसारखे महोत्सव आयोजित करून अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीचा गौरव वाढविण्याचे कामही भाजपा सरकार करत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. मध्यप्रदेशात ३०० कोटी रुपयांचे स्मारक, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या निधीची तरतूद, तसेच अनेक योजनांमधून धनगर समाजाला न्याय देण्याचे काम सरकारने केल्याचे समाजाने नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर “भाजपा हीच समाजाच्या विकासाची हमी देणारी पक्षसंस्था असून, चिखली शहराच्या प्रगतीसाठी पंडित दादा देशमुख सक्षम नेतृत्व ठरतील,” असा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
धनगर समाजाच्या या पाठिंब्यामुळे चिखली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाची ताकद आणखी बळकट झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.



