Home / मत / संपादकीय / संभाजीनगर रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रस्त्यास ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्ग’ असे नांव देण्याची मागणी — वंचित बहुजन आघाडीचे निवेदन नगरपरिषदेपुढे

संभाजीनगर रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रस्त्यास ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्ग’ असे नांव देण्याची मागणी — वंचित बहुजन आघाडीचे निवेदन नगरपरिषदेपुढे

चिखली (लोक महाराष्ट्र न्यूज) – संभाजीनगर, चिखली येथील मेन सिमेंट रोडवर तातडीने स्पीड ब्रेकर बसविणे व त्या रस्त्यास ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्ग’ असे नांव देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, चिखली शहर शाखेच्या वतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संभाजीनगर परिसरातील हा मुख्य सिमेंट रोड मागील दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला असला, तरी आजपर्यंत त्या ठिकाणी कोणतेही स्पीड ब्रेकर बसविण्यात आलेले नाहीत. परिणामी, अनेक वाहनचालक या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालवतात. हा रस्ता जाफ्राबाद रोड, संभाजीनगर, कॅसान, चैतन्यनगर, आदर्श शाळा, उदासीन महाराज मठ, जुने गाव आणि चिंच परिसर अशा महत्त्वाच्या भागांना जोडणारा असल्याने येथे सतत वाहनांची वर्दळ असते.
गेल्या दोन वर्षांत या रस्त्यावर अनेक अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी नमूद केले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ७० वर्षीय वृद्ध महिलेला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या परिसरातून शाळकरी मुले, लहान मुले वारंवार ये-जा करतात, त्यामुळे अपघातांची शक्यता अधिक आहे.
तसेच या रस्त्याचे बांधकाम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निधीतून झाल्याने, त्याच रस्त्यास ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्ग’ असे नांव देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की, येत्या ७ दिवसांच्या आत रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्यात आले नाहीत आणि नामांतराचा निर्णय झाला नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देताना शहराध्यक्ष बाळू भिसे, शहर संघटक सुमेध जाधव, राज बोर्डे (पॅंथर), सतीश यंगड, नामदेव साळवे, चेतन भालेराव, मिलिंद कुमार माघाडे, प्रफुल्ल गवई, सखाराम राऊत, प्रवीण डोंगरदिवे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार