जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळांना प्रशासनाचे आवाहन
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर शहर व परिसरात यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेला पूर्णपणे बंदी राहणार आहे. डीजे लावल्यास संबंधित गणेश मंडळ अथवा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. डीजे बंदी म्हणजे बंदीच! असा स्पष्ट इशारा सपोनि अकुंश जाधव यांनी दिला.
आगामी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता फत्तेपूर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीसंदर्भात विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
गणेशोत्सव हा सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सपोनि अकुंश जाधव यांनी केले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
डीजेबाबत प्रशासनाची भूमिका अत्यंत स्पष्ट असून कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर अथवा संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कारवाईची संपूर्ण जबाबदारी संबंधितांचीच राहील, असा इशाराही पोलिसांनी दिला.
यावेळी फत्तेपूर शहरातील सर्वधर्मीय सलोख्याची परंपरा कायम ठेवत ‘आपले शहर, आपला गणेशोत्सव’ या भावनेतून सर्वांनी गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने करण्यात आले. डीजेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे उदाहरण देताना पोलीस अधिक्षक चाळीसगाव अशोक नखाते यांनी आपल्या मित्राच्या कानावर डीजेच्या मोठ्या आवाजाचा परिणाम झाल्याचे सांगितले. उपचारासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च करावा लागल्याचे उदाहरण देत ध्वनिप्रदूषणाचे गांभीर्य त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने विविध देखावे, सामाजिक संदेश देणारे उपक्रम आणि शिस्तबद्ध मिरवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
गणेश विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत असून, नागरिकांनी व गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सपोनि अकुंश जाधव यांच्या कडून यावेळी करण्यात आले.
बैठकीस फत्तेपूर, देवळगाव गुजरी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.





