मानोरा प्रतिनिधी सुधीर ढगे
मानोरा ते विठोली पायी कावड यात्रा; तीन हजार शिवभक्तांना महाप्रसाद
मानोरा : येथील जय भोले कावड मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मानोरा ते विठोली कावड यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गणेश मंदिर परिसरातील अरुणावती नदीतून पवित्र जल भरून १५१ भरण्यांची कावड तयार करण्यात आली. सकाळी १० वाजता गणेश मंदिर, मानोरा येथून सुरू झालेली ही कावड यात्रा रात्री ८ वाजता विठोली येथील शिवपार्वती मंदिरात पोहोचले कावड यात्रेचा मार्ग गणेश मंदिर, काठी नगर, मार्केट लाईन, दिग्रस रोड, नाईक नगर, वसंत नगर तसेच प्रभाग क्रमांक १०, ११, १२, १३ व १४ मार्गे विठोली गाव असा होता. विठोली येथील शिवपार्वती मंदिरात पवित्र जलाने भगवान शिवाचा अभिषेक करण्यात आला. या कावड यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘लेकुरवाळी कावड’ म्हणून तिची ओळख आहे. विशेष म्हणजे या यात्रेत पुरुषांपेक्षा महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सकाळी दहा वाजता निघाली कावड यात्रा रात्री आठ वाजता विठोली येथे पोचली.अनेक भाविक कावडीमध्ये विविध नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर श्रद्धेने कावड यात्रेत सहभागी होतात. प्रत्येक घरासमोर कावडीचे पूजन करण्याची परंपराही या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले.कावड यात्रेदरम्यान शहरातील विविध ठिकाणी शिवभक्तांसाठी नागरिक व भाविकांच्या वतीने उसळ, चना, चहा-पाणी तसेच फळांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील बांधवांनीही दोन ठिकाणी शिवभक्तांसाठी उसळ वाटप करून सामाजिक एकोपा व बंधुभावाचा संदेश दिला. कावड यात्रेला भाजपा प्रदेश संयोजक भक्तराज महाराज राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, पप्पू सेठ हेडा, संजय हेडा, राजू गुल्हाने, राजेश शहाणे व भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद इंगोले यांनी भेट देऊन कावडीचे दर्शन व पूजन केले. विठोली येथे कौस्तुभ पाटील डहाके यांनी कावडीचे दर्शन व पूजन केले. यावेळी मंडळाच्या वतीने कौस्तुभ पाटील डहाके व संजय भाऊ राठोड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कौस्तुभ पाटील डहाके यांच्या हस्ते जय भोले कावड मंडळाचे संस्थापक राजेंद्र देशमुख, कावडीचे पुजारी रघुनाथ आप्पा बेंद्रे, भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद इंगोले, शिवभक्त शेखर गाढवे, तेजस बेंद्रे, सागर भाकरे, सुधीर ढगे, प्रमोद चांदुरकर, भूषण आसरे, आकाश गाढवे, रवी गवई, अंकुश बेंद्रे, जय गिरी जय पाटील शिवभक्ताचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कावड भक्तांचे कौतुक केले. दरम्यान, विठोली येथील शिवपार्वती संस्थानच्या वतीने सुमारे तीन हजार शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. पवित्र जलाने शिवपार्वती मंदिरात अभिषेक झाल्यानंतर भक्तिमय वातावरणात कावड यात्रेची सांगता झाली. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी ही कावड यात्रा परिसरातील शिवभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. (






