जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
“अज्ञात वाहनाचा बळी की प्रशासनाचा निष्काळजीपणा? सोहमच्या हातून वडिलांना अग्नी”
“महामार्गावर मृत्यूचा सुळसुळाट; वेगावर नियंत्रण नाही, कारवाई शून्य!”
पहूर, ता. जामनेर :
जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी गेला असून, भवानी माता मंदिराजवळ दि.३/४/२६ रोजी शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पहूर येथील ४५ वर्षीय नरेंद्र उर्फ बाळू वसंत बडगुजर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नरेंद्र बडगुजर हे डेंटल इक्विपमेंट सेल्स अँड सर्व्हिस व्यवसाय करत होते. नेहमीप्रमाणे ते जळगावहून आपले काम आटोपून दुचाकीने (क्र. एमएच १९ ईक्यू ८३५४) पहूरकडे परतत असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ते काही अंतर फरफटत गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने तात्काळ मदत मिळाली नाही. ही बाब प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. महामार्गावरून जाणाऱ्या एका गॅरेज चालकाने दुचाकीच्या नंबरवरून माहिती मिळवून त्यांच्या कुटुंबीयांना कळवले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
मृतदेहाचे पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सहावीत शिकणाऱ्या त्यांच्या चिमुकल्या मुलगा सोहमने वडिलांच्या चितेला अग्नी दिल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. या हृदयद्रावक प्रसंगाने गावभर हळहळ व्यक्त होत आहे.
नरेंद्र बडगुजर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. ते निवृत्त मुख्याध्यापक वसंत बडगुजर यांचे सुपुत्र तसेच आई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र बडगुजर यांचे धाकटे बंधू होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पहूर गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, जामनेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि प्रमोद कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलीस यांच्या वतीने सुरू आहे. मात्र, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणा कितपत तत्परता दाखवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनावर संताप
या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी वाळू व गौण खनिज वाहतूक करणारे डंपर बेफाम वेगाने धावत असून, त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.
स्थानिकांच्या मते, “महामार्गावर ना वेगमर्यादा पाळली जाते, ना पोलीस गस्त दिसते. अपघात झाले की केवळ नोंद — कारवाई मात्र शून्य!”
ईश्वर हिवाळे पत्रकार तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पहूर शहर अध्यक्ष ता जामनेर






