संघ शताब्दी मध्ये संघ स्वयंसेवक नगराध्यक्ष होणे ही अभिमानाची बाब…..आ. सौ. श्वेता महाले.

चिखली शहराचे नवनियुक्त लोकनिर्वाचित नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचा पदग्रहण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेवक, मान्यवर पत्रकार, विविध समाजांचे प्रतिनिधी, महिला बचत गटांच्या भगिनी तसेच भाजपा-शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी भारतीय जनता पक्षाची उमेदवार निवडीची कार्यपद्धती स्पष्ट केली. पक्ष केवळ एका सर्वेक्षणावर निर्णय घेत नाही, तर प्रत्येक समाजघटकापर्यंत जाऊन अनेक सर्वे, प्रत्यक्ष जनसंपर्क आणि वस्तुनिष्ठ अहवालांच्या आधारे निर्णय घेतो, असे त्यांनी सांगितले. याच पारदर्शक प्रक्रियेमुळे पंडितराव देशमुख यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार महाले पाटील यांनी नगरपरिषदेला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या प्रचारासाठी चिखलीत आले असताना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सर्व आश्वासनांची त्वरित पूर्तता करण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने ठराव घ्यावेत. दिलेला शब्द पूर्ण करणे हीच खरी राजकीय जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शहराच्या विकासासाठी भूमिगत गटार योजना तातडीने राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी लागणारा निधी शासनाकडून आणण्याची जबाबदारी आपण स्वतः घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी ठोस आणि दीर्घकालीन विकास होईल असे निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चिखली शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची सर्वांची इच्छा असून, त्यासाठीचा शब्द माननीय मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात दिला होता त्यामुळे हा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निवडणुकीपूर्वी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला जाईल, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने चिखली शहरासाठी मंजूर झालेल्या १२३ कोटी रुपयांच्या नळयोजनेचे काम सध्या प्रगतीपथावर असून सुमारे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दर्जेदार व वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित प्रभागातील सर्व नगरसेवकांची राहील,असे आमदार महाले पाटील यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराबाबत बोलताना त्यांनी शून्य सहनशीलतेची भूमिका जाहीर केली. नगरपालिका, नगराध्यक्ष, आमदार आणि सरकार एकाच पक्षाचे असले तरी कोणत्याही कामात गैरप्रकार, निकृष्ट दर्जा किंवा भ्रष्टाचार आढळल्यास पक्ष, पद किंवा ओळख न पाहता कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
शेवटी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितले की, निवडणुका वेगवेगळ्या पक्षांनी लढवल्या असल्या तरी विकासाच्या दृष्टीने नगरपरिषदेमध्ये महायुतीचीच सत्ता आहे. विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही राजकारण बाजूला ठेवून चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांना शुभेच्छा दिल्या…






