Home / समाज / केशेगावातील भीषण विद्युत अपघाताने महाराष्ट्र हादरला; मृत शेतकरी कुटुंबांना तातडीची मदत द्यावी – ॲड. शंकर चव्हाण यांची राज्य सरकारकडे मागणी

केशेगावातील भीषण विद्युत अपघाताने महाराष्ट्र हादरला; मृत शेतकरी कुटुंबांना तातडीची मदत द्यावी – ॲड. शंकर चव्हाण यांची राज्य सरकारकडे मागणी

» धाराशिव | प्रतिनिधी :

शेतकरी बापलेकांच्या दोन जोड्या एका क्षणात विजेच्या झटक्याने कायमच्या शांत झाल्याची हृदयद्रावक घटना तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव शिवारात घडली असून, या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. शेतकऱ्यांचे जगणे किती असुरक्षित आणि संकटांनी भरलेले आहे, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड. शंकर चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकारकडे या कुटुंबांना तातडीची आणि भरीव मदत जाहीर करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास केशेगाव येथील शेतकरी गणपती साखरे यांच्या शेतात बोअरमधून मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू होते. कप्पीच्या सहाय्याने हे काम चालू असताना, दुर्दैवाने कप्पीचा महावितरणच्या जिवंत विद्युत तारेस स्पर्श झाला. काही क्षणांतच काम करणारे सर्वजण तीव्र विद्युत प्रवाहाच्या कचाट्यात सापडले आणि या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत काशिम कोंडीबा फुलारी (वय ५४), रतन काशिम फुलारी (वय १६), नागनाथ काशिनाथ साखरे (वय ५५) आणि रामलिंग नागनाथ साखरे (वय ३१), सर्व रा. केशेगाव, ता. तुळजापूर, यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाप-लेकांच्या दोन जोड्या एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत

 

 

ॲड. शंकर चव्हाण म्हणाले की, शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाशी, कर्जाच्या ओझ्याशी आणि अपुऱ्या सुविधा यांच्याशी झुंज देत आहेत. त्यातच अशा प्रकारचे विद्युत अपघात त्यांच्या कुटुंबांवर कोसळत असतील, तर हे केवळ दुर्दैव नाही तर व्यवस्थेचे अपयश आहे. शेतांमधून जाणाऱ्या जिवंत विद्युत तारा, असुरक्षित वीजपुरवठा आणि योग्य संरक्षणात्मक उपायांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचे प्राण धोक्यात येत आहेत, याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे.ॲड. चव्हाण यांनी राज्य सरकारकडे मागणी केली की, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चारही कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी. केवळ औपचारिक घोषणा न करता, प्रत्यक्षात या कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घ्यावी. मृतांच्या कुटुंबातील आश्रितांना शासकीय मदत, शैक्षणिक आधार, तसेच किमान एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचा विचार करावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.ते पुढे म्हणाले की, महावितरणसारख्या यंत्रणांनी शेतांमधील विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर आणि वीजपुरवठ्याच्या सुरक्षिततेबाबत तातडीने सर्वेक्षण करून उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा असे अपघात पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होत राहतील. “शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत इतकी स्वस्त का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या काशिम फुलारी, रतन फुलारी, नागनाथ साखरे आणि रामलिंग साखरे यांना ॲड. शंकर चव्हाण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण समाज त्यांच्या सोबत उभा आहे, असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरणे आखली गेली नाहीत, तर अशा घटनांचा सिलसिला थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार