शिक्षण क्षेत्रात राजकारण करून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करू नका – प्रशांत पाटील

बुलढाणा : आज शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते प्रशांत ढोरे पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत उपस्थित केलेल्या TET विरोधी भूमिका आणि वक्तव्यांवर जोरदार प्रहार केला आहे.
त्यांनी सुळे यांना उद्देशून स्पष्ट शब्दांत म्हटले “ताई, एक गोष्ट स्पष्ट सांगतो
तुमची मुलं कुठे शिकली? उच्च दर्जाचं शिक्षण, उत्तम सुविधा आणि आमच्या शेतकरी शेतमजूर पालकांच्या मुलांच्या बाबतीत मात्र ‘अप्रशिक्षित शिक्षकही चालतील’ असं म्हणणं हा कसलं न्यायाचं तत्त्व?”
पुढे बोलताना त्यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील तुटवड्यावर कडक शब्दांत प्रश्न उपस्थित केले “आज राज्यातील हजारो पालक लाखो रुपये खर्च करून कोटा-राजस्थानसारख्या ठिकाणी मुलांना शिकवतात कारण येथे आपल्या राज्यात दर्जेदार शिक्षण नाही, शिक्षक प्रशिक्षित असणे ही मूलभूत गरज आहे. TET म्हणजे शिक्षा नाही TET म्हणजे जवाबदारीची किमान हमी आहे.”प्रशांत ढोरे पाटील यांनी विरोध करणाऱ्यांना थेट प्रश्न केला “आपली स्वतःची मुलं TET न पास झालेल्या शिक्षकांकडे शिकायला पाठवाल का? मग शेतकरी, कामगार, गोरगरीब पालकांच्या मुलांवर ‘प्रयोग’ कशासाठी?”
शिक्षण विषयावर कोणत्याही नेत्याने राजकारण करू नये अशी कडक चेतावणी त्यांनी दिली “शिक्षणावर राजकारण करू नका, विद्यार्थी महत्त्वाचे की तुमचे मतदार?
दर्जेदार शिक्षक आणि दर्जेदार शिक्षण हा आमच्या मुलांचा हक्क आहे त्यावर तडजोड मान्य नाही.”
शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना समर्थन देताना त्यांनी मात्र स्पष्ट केले “योग्य शिक्षक हवा हे आमचं ठाम मत आहे. TET हा गुणवत्ता मापदंड असून त्याला विरोध करणे म्हणजे मुलांच्या भविष्यासोबत खेळणे आहे.”
शेवटी त्यांनी पुन्हा सांगितले “शिक्षण हा राजकारणाचा विषय नाही
तो भविष्यातील देशाचा पाया आहे.” व सुप्रिया सुळे यांच्यासह जे शिक्षण क्षेत्रात राजकारण करत असतील त्यांनी किमान विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करू नका असा इशारा दिला आहे.



