

चिखली : (प्रतिनिधी उमा जैवाळ ) नगर परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात महाविकास आघाडीच्या प्रभागनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या कॉर्नर मिटिंगला नागरिकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, प्रभागागणिक मविआचा बोलबाला वाढताना स्पष्टपणे दिसत आहे. विविध समाजघटक, तरुण मतदार, महिला संघटना आणि वयोवृद्ध नागरिक या बैठकींमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याने महाविकास आघाडीचा जनाधार दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे, संदेश आंबेडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रभागनिहाय कॉर्नर मिटिंग घेत असल्याने उमेदवारांचा आत्मविश्वास वाढला आहे. देव माणसालाचं साथ द्या अन् काशिनाथ आप्पालाचं मत द्या ! या घोषणांनी प्रचार सभा गाजत आहे.
प्रभाग १ ते १४ दरम्यान होत असलेल्या या सभांमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या वरील विश्वास अधोरेखित होत आहे. विकासकामांची सविस्तर मांडणी, सुशासनाचे आश्वासन, पारदर्शक कारभाराची हमी आणि शहराच्या दीर्घकालीन प्रगतीचा आराखडा मांडल्याने नागरिकांचा कल मविआकडे झुकलेला दिसतो.
प्रभागनिहाय होणाऱ्या या सततच्या भेटीगाठींमुळे महाविकास आघाडीने चिखली शहरात मजबूत पकड निर्माण केली असून, निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा मविआचा प्रभाव आणखी वाढताना दिसत आहे. वातावरणावरून हे स्पष्ट होते की, चिखलीकर विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देत असून, मविआच्या पॅनलला ठोस समर्थन देण्याच्या मनःस्थितीत आहेत.