चिखलीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रचार कार्यालयाचे आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते उद्घाटन
चिखली : चिखली नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आ. सौ. श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी उपस्थित नागरिक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना आमदार महाले म्हणाल्या की, “चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा अशा मूलभूत गरजांवर अधिक वेगाने आणि नियोजनबद्धपणे काम होणे अत्यावश्यक आहे.”

शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच नागरिकांच्या नवीन अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ठोस आराखडा तयार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “स्थानिक स्वराज्य संस्थेत सातत्यपूर्ण कामकाज आणि दृढ नेतृत्व महत्त्वाचे आहे. पंडितदादा यांच्या रूपाने आपल्याला एक सक्षम उमेदवार मिळाला असून, त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे हे आपले कर्तव्य आहे,” असे त्या म्हणाल्या.
तसेच केंद्र व राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध नागरी सुविधा योजनांमुळे शहरांना मोठ्या प्रमाणावर विकासाची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. “चिखली नगरपरिषदेवर कमळ फुलले तर विकासाच्या वाटा वेगाने रुंदावतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन कार्यक्रमाला विविध सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामकृष्ण दादा शेटे, तसेच संजय छके, सुरेश अप्पा कबुतरे, शिवराज पाटील, संजय गाडेकर, पंजाबराव धनवे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



