Home / Uncategorized / बेंडाळेच्या मुलींची बेसबॉलमध्ये चमक; उपविजेतेपदासह पाच खेळाडूंची विभागीय संघात निवड …

बेंडाळेच्या मुलींची बेसबॉलमध्ये चमक; उपविजेतेपदासह पाच खेळाडूंची विभागीय संघात निवड …

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव विभागातर्फे नूतन मराठा महाविद्यालय येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेत डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विभागीय संघासाठी निवड झाली आहे.

 

या स्पर्धेत पुरुषांचे सात, तर महिला विभागाचे पाच संघ सहभागी झाले होते. महिला विभागातील सामन्यात बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या संघाने डी. एन. महाविद्यालय, फैजपूर संघाविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात नूतन मराठा महाविद्यालयाच्या संघासोबत अटीतटीची लढत झाली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने सामना चुरशीचा ठरला. अखेर बेंडाळे महिला महाविद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

 

संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कु. देवयानी सोनवणे, कु. नम्रता बाविस्कर, कु. पूनम सोनवणे, कु. भूमिका सूर्यवंशी आणि कु. कृष्णाली चांडेलकर यांची विभागीय संघासाठी निवड झाली.

 

उपविजेत्या संघाला डॉ. अनिता कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे व डॉ. पी. एन. तायडे यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बेसबॉलमध्ये मिळविलेले उपविजेतेपद आणि पाच खेळाडूंची विभागीय संघात झालेली निवड यामुळे बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार