छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ; श्रमदानातून दिला स्वच्छतेचा संदेश;विकास पाटील
“स्वच्छता हीच खरी सेवा आणि श्रमदानातूनच समाजपरिवर्तनाची सुरुवात होते.” या विचाराला कृतीची जोड देत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. विकास पाटील सर, विद्यालयाच्या सचिव रत्नाताई कोलते पाटील, अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील, माजी प्राचार्य एन. आर. कोलते पाटील तसेच शिक्षकवृंद यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे प्राचार्य जीवन कोलते पाटील यांनी केले. यावेळी अमोल कोलते पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वावलंबन व स्वच्छतेच्या विचारांचा तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेच्या कार्याचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे विचार केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचार-विचार आणि दैनंदिन जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.
महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला राष्ट्रनिर्मितीशी जोडले, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा व कर्तव्यनिष्ठेचा आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी स्वच्छ विद्यालय, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
यानंतर प्रा. विकास पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. “मी माझे घर, विद्यालय, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवीन. स्वच्छतेबाबत इतरांमध्येही जनजागृती करीन,” असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला.
कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे मैदान, इमारत परिसर तसेच आजूबाजूच्या परिसरात श्रमदान केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमातून स्वच्छता ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी आहे, असा संदेश देण्यात आला.
यावेळी भास्कर खबांट यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, पाण्याची बचत आणि जलसंवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन केले. भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक असून प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी एन. आर. कोलते पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण सरकटे यांनी केले. राष्ट्रपुरुषांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत झालेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.






