जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पीआय अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर दि.४/१०/२०३६ रोजी फत्तेपूर पोलिसांनी धडक कारवाई करीत तब्बल ६ हजार लिटर रसायन जप्त केले. फत्तेपूर शिवारातील कांग नदीकाठी सुरू असलेल्या या अवैध हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकल्याने परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापे रोहम पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कांग नदीकाठच्या परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर मिठाराम कोळी हा गावठी हातभट्टीद्वारे अवैधरित्या दारू निर्मिती करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरील दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील रसायन ताब्यात घेतले.
या कारवाईत तब्बल ६ हजार लिटर रसायन जप्त करण्यात आले. अवैध हातभट्टीच्या माध्यमातून गावठी दारू निर्मिती करून शासनाच्या महसुलाला फटका देणाऱ्यांविरुद्ध फत्तेपूर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२०/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदीकाठच्या हातभट्ट्यांवर पोलिसांची करडी नजर
फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नदीकाठ, शेतशिवार तसेच निर्जन भागात सुरू असलेल्या अवैध हातभट्ट्या आणि गावठी दारू निर्मिती केंद्रांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा सपोनि अकुंश जाधव यांच्या कडून देण्यात आला आहे.
या धडक कारवाईमुळे फत्तेपूर परिसरातील अवैध हातभट्टी व्यवसायाला मोठा हादरा बसला असून, पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.






