छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
नागरिकांना दिलासा देण्याची सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी..
नाशिक जिल्ह्यात यंदा अल्प पावसामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक भागांत पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आगामी दिवाळी सण गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना आनंदात साजरा करता यावा, यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी रेशन दुकानांमधून ‘आनंदाचा शिधा’ वितरित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी (बारागाव पिंपरी) यांनी महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यंदाच्या कमी पावसाचा शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. पिकांचे अपेक्षित उत्पादन न झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर दैनंदिन खर्चाबरोबरच सणासुदीच्या काळातील अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे शासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घेऊन गरजू कुटुंबांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गोसावी यांनी केली आहे.
शासनाने दसऱ्यापूर्वी किंवा दिवाळीच्या आधीच रेशन दुकानांवर आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिल्यास आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. शिधा किटचे वितरण वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे, तसेच जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आनंदाच्या शिध्यामध्ये देण्यात येणारे रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल दर्जेदार असावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. रेशन दुकानांपर्यंत शिधा किट वेळेत पोहोचविण्यात यावेत आणि वितरणाच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, यासाठी संबंधित विभागाला स्पष्ट सूचना देण्याची गरज असल्याचे दत्तात्रेय गोसावी यांनी म्हटले आहे.
दिवाळी हा सर्वसामान्यांच्या आनंदाचा आणि कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याचा उत्सव आहे. मात्र आर्थिक अडचणीमुळे अनेक गरीब व गरजू कुटुंबांना सणाचा आनंद घेणे कठीण होत आहे. अशा कुटुंबांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने मानवतावादी दृष्टिकोनातून तातडीने आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी, मजूर आणि गोरगरीब कुटुंबांना दिवाळीच्या काळात शासनाच्या मदतीचा आधार मिळावा आणि प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी आनंदाचा शिधा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दत्तात्रय गोसावी यांनी केली आहे






