Home / Uncategorized / अक्षरधारेतून जामनेरमध्ये साहित्याचा सुरेल जागर…

अक्षरधारेतून जामनेरमध्ये साहित्याचा सुरेल जागर…

 जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

राज्यस्तरीय ‘अक्षरधारा कवी संमेलन-२०२६’ उत्साहात; कविवर्य आनंदा वारांगणे यांच्या ‘वेणू’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

जामनेर : कविता, साहित्य आणि संस्कृतीच्या त्रिवेणी संगमाने जामनेर नगरी शुक्रवारी अक्षरशः भारावून गेली. जगद्‌गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, जामनेर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘अक्षरधारा कवी संमेलन-२०२६’ व पुस्तक प्रकाशन सोहळा जळगाव रोडवरील मराठा समाज मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण आणि साहित्यिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी कविवर्य मा. आनंदा वारांगणे सर लिखित ‘वेणू’ या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या साहित्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जगद्‌गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे सुरत जिल्हाध्यक्ष तथा खान्देश साहित्य संघ, सुरतचे अध्यक्ष मा. ईश्वर राजाराम पाटील होते. ग.स. सोसायटी, जळगावचे उपाध्यक्ष मा. अनिल कौतिक गायकवाड पाटील यांनी स्वागताध्यक्षपदाची भूमिका पार पाडली. तर जगद्‌गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे जामनेर तालुकाध्यक्ष मा. शिवाजी आहेर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या निमित्ताने साहित्यप्रेमी, कवी, लेखक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकवृंद आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने एकत्र आले होते. काव्याच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, मानवी संवेदना, नातेसंबंध, संस्कृती आणि जीवनातील विविध भावछटा उलगडत कवींनी उपस्थितांची मने जिंकली.

कविवर्य आनंदा वारांगणे यांच्या ‘वेणू’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला. शब्दांच्या माध्यमातून जीवनातील विविध अनुभवांना काव्यरूप देणाऱ्या या साहित्यकृतीचे उपस्थितांनी कौतुक केले. ‘वेणू’च्या प्रकाशनामुळे साहित्यविश्वात आणखी एका साहित्यकृतीची भर पडली असून, जामनेरच्या साहित्यिक वाटचालीत हा सोहळा महत्त्वाचा ठरला.

अध्यक्षीय मनोगतात ईश्वर राजाराम पाटील यांनी साहित्य आणि काव्य हे समाजाच्या संवेदना जागृत ठेवणारे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन केले. साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मराठी साहित्याची अभिरुची वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन करत अशा राज्यस्तरीय साहित्यिक उपक्रमांमुळे जामनेरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्राला नवी ऊर्जा मिळत असल्याचे नमूद केले.

या प्रसंगी ईश्वर राजाराम पाटील, कविवर्य आनंदा वारांगणे, उपसंपादक गोकुळसिंग राजपूत, कविवर्य सागर झनके जळगाव जामोद,प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकवृंद, साहित्यिक, कवी तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार