लोक महाराष्ट्र न्यूज उमा जैवाळ
तीन रुग्णालये, दोन बालरुग्णालये असलेल्या परिसरात अस्वच्छतेचा प्रश्न; नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे प्रश्न
चिखली : चिखली शहरातील पुंडलिक नगर परिसरातील कमानीजवळ तसेच बायपासवरील एसटी डेपोच्या पाठीमागील भागात कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे चित्र समोर आले आहे. घंटागाडी नियमित आणि वेळेवर येत नसल्याने नागरिकांना घरातील कचरा परिसरात टाकण्याची वेळ येत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा, खाद्यपदार्थांचे अवशेष तसेच इतर कचरा जमा होत असल्याचे दिसून येत आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरत असून परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
रुग्णालयांच्या परिसरातच कचऱ्याचे ढीग
विशेष म्हणजे कचरा साचत असलेल्या परिसरात तीन रुग्णालये असून त्यापैकी दोन बालरुग्णालये असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या आसपासच अस्वच्छता निर्माण होत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणाऱ्या रुग्णालयांच्या परिसरातच कचऱ्याचे ढीग साचत असल्याने स्वच्छता व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांचा सवाल; कचरा टाकायचा तरी कुठे?
घंटागाडी नियमित येत नसेल तर घरातील कचरा नागरिकांनी कुठे टाकायचा, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कचरा संकलनाची व्यवस्था नियमित करणे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा साचू न देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, संबंधित ठिकाणी तातडीने स्वच्छता करून साचलेला कचरा उचलावा, घंटागाडीचे वेळापत्रक नियमित करावे आणि भविष्यात पुन्हा कचरा साचणार नाही यासाठी प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आरोग्याशी संबंधित संवेदनशील परिसरात कचऱ्याची समस्या कायम राहिल्यास प्रशासन याकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






