उमा जैवाळ लोक महाराष्ट्र न्यूज
दहिगाव इंडियन गॅस एजन्सीसमोरील नालीवरील स्लॅब तुटला; दिवसेंदिवस वाढतोय धोका
चिखली : चिखली शहरातील दहिगाव इंडियन गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर नालीवरील ढाचा तुटलेला असून, सुरुवातीला तुटलेला भाग आता दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. आजूबाजूचा नालीवरील स्लॅबदेखील तुटत असल्याने या ठिकाणी मोठा धोका निर्माण झाला आहे.

या ठिकाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. विशेषतः अवजड वाहने या मार्गावरून जात असल्याने तुटलेल्या नालीवरील ढाच्यावर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे हा ढाचा अधिक क्षतिग्रस्त होऊन अचानक कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे या नालीखाली मोठी जागा असल्याने ढाचा कोसळल्यास वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. एखादे अवजड वाहन या ठिकाणी अडकल्यास किंवा नालीमध्ये कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चिखली शहरातील हा मुख्य रस्ता असल्याने दररोज हजारो नागरिक या मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहण्यापेक्षा, दुर्घटना होण्यापूर्वीच संबंधित यंत्रणांनी या ठिकाणी पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या धोकादायक परिस्थितीकडे MSRDC, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच चिखली नगरपरिषद यांनी संयुक्तपणे लक्ष देऊन रस्त्याची व नालीवरील ढाच्याची पाहणी करावी आणि आवश्यक ती कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

प्रश्न असा आहे की, एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला या धोकादायक परिस्थितीची दखल घ्यायची आहे का?






