जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
श्रावणाच्या पूर्वसंध्येला विषबाधेने दोन बैलांचा मृत्यू; शेतातच दिली माती
पहूर, ता. जामनेर : श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येलाच पहूर येथे एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. विषबाधेमुळे दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या बारा वर्षांपासून जीवापाड जपलेल्या बैलजोडीचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने शेतकरी रामदास ओंकार चौथे यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बैल हे केवळ शेतीची अवजारे नसून कुटुंबातील सदस्यच होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पहूर येथील लेले नगर परिसरात राहणारे शेतकरी रामदास चौथे यांच्या खळ्यात बैल बांधलेले असताना त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने रामदास चौथे यांना माहिती दिली. त्यानंतर श्री .चौथे यांनी अशोक जाधव यांना संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून बैलांवर प्रथमोपचार करण्यात आले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत व्यवहारे यांनी घटनास्थळी धाव घेत बैलांची पाहणी केली. मात्र,तोपर्यंत दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता.
चौथे कुटुंबाकडे ही बैलजोडी गेल्या बारा वर्षांपासून होती. शेतातील प्रत्येक कामात या बैलांनी कुटुंबाची साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्याशी कुटुंबीयांचे अतूट भावनिक नाते निर्माण झाले होते. अचानक दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याने चौथे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, ज्या शेतात या बैलांच्या कष्टातून शेतकऱ्याने पीक फुलवले, त्याच शेतात अखेर त्यांना माती देण्यात आली. अंत्यसंस्काराच्या वेळी शेतकरी रामदास चौथे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. या हृदयद्रावक प्रसंगाने उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थही भावूक झाले. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
या घटनेमुळे शेतकऱ्याच्या जीवनात जनावरांचे असलेले भावनिक महत्त्व अधोरेखित झाले.






