Home / Uncategorized / इस्रूळच्या जलजीवन मिशनच्या कामावर युवासेनेचा हातोडा!

इस्रूळच्या जलजीवन मिशनच्या कामावर युवासेनेचा हातोडा!

लोक महाराष्ट्र न्यूज उमा जैवाळ

निकृष्ट कामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी आणि ठेकेदाराची देयके रोखण्याची मागणी

 

इस्रूळ, ता. चिखली

चिखली तालुक्यातील इस्रूळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. काम सुरू असतानाच निकृष्ट दर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी केला आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत इस्रूळ येथे पाण्याच्या टाकीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. कामाच्या सुरुवातीपासूनच बांधकामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आणून देत, काम इस्टिमेटनुसार आणि तांत्रिक निकषांनुसार करून घेण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप भुतेकर यांनी केला आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रश्नचिन्ह

काम पूर्ण झाल्यानंतर टाकीची पाहणी केली असता बांधकामात अनेक त्रुटी आढळून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. टाकीचा आकार, बांधकामातील विविध घटक, कामाची गुणवत्ता आणि इतर बाबींमध्ये अनियमितता असल्याचे संतोष भुतेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

विशेष म्हणजे, संबंधित कामाच्या दर्जाबाबत केवळ तोंडी आरोप न करता कामातील कथित त्रुटींचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चर्चेत आले आहे.

“सर्वसामान्य जनतेसाठी कायम दुष्काळ; अधिकाऱ्यांचा सुकाळ कशासाठी?”

यावेळी संतोष भुतेकर यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “काम सुरू असतानाच अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले होते. त्यावेळीच कामाची गुणवत्ता तपासली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. सर्वसामान्य जनतेसाठी कायमच दुष्काळ; मात्र अधिकाऱ्यांचा ‘सुकाळ’ कशासाठी?”

देयके रोखून चौकशीची मागणी

सदर कामाची तांत्रिक पद्धतीने तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका चौकशीच्या कक्षेत आणावी, तसेच काम निकृष्ट असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित ठेकेदाराची देयके रोखावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच निकृष्ट काम आढळल्यास त्याची दुरुस्ती कोण करणार, नव्याने काम करून दिले जाणार का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही भुतेकर यांनी केली आहे.

 

“सोक्षमोक्ष लागल्याशिवाय थांबणार नाही”

या संपूर्ण प्रकरणाचा लेखाजोखा आणि सोक्षमोक्ष लागल्याशिवाय आपण शांत बसणार नसल्याचा इशारा संतोष भुतेकर यांनी दिला आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला असून, टाकीच्या ठिकाणी ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन संबंधित कामाची प्रत्यक्ष तांत्रिक तपासणी करते का, कथित त्रुटी दूर करण्यासाठी काय कारवाई केली जाते आणि संबंधित ठेकेदाराच्या देयकांबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे इस्रूळ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार