छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
शेतकऱ्यांच्या मागणीला मिळाला दिलासा; शासनाच्या निर्णयाचे चव्हाण यांच्याकडून स्वागत

सिल्लोड : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागत करत शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी शासनाचे आभार मानले असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचेही आभार व्यक्त केले आहेत.
सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला. कापूस, सोयाबीन, मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. पावसाअभावी विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सिल्लोड आणि सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. शेतकऱ्यांच्या या मागणीला अखेर शासनाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
“सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणे अत्यंत आवश्यक होते. शासनाने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,” असे धरमसिंग चव्हाण यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यामुळे शासनाच्या नियमांनुसार पात्र शेतकऱ्यांना विविध दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीक नुकसान, पाणीटंचाई, चारा उपलब्धता तसेच इतर आवश्यक मदतीसाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबविणे अपेक्षित आहे.
दरम्यान, निर्णय जाहीर झाल्यानंतर सिल्लोड, सोयगाव तसेच सावळदबारा परिसरातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
“शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविणे आणि त्यांना आवश्यक मदत मिळवून देणे ही काळाची गरज आहे. दुष्काळग्रस्त यादीतील समावेशानंतर आता शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा प्रत्यक्ष लाभ लवकरात लवकर मिळावा,” अशी अपेक्षाही तालुका प्रमुख धरमसिंग चव्हाण यांनी व्यक्त केली.






