उमा जैवाळ लोक महाराष्ट्र न्यूज
रोजगार हमीची कामे वाढविण्यासह पाणी, चारा व धान्याची व्यवस्था करण्याची शिवाजी शिराळे पाटील यांची मागणी

चिखली, दि. २८ सप्टेंबर : चिखली तालुक्यासह ग्रामीण भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका भूमिहीन शेतमजूर, रोजंदारीवर काम करणारे मजूर, बेरोजगार युवक आणि गरीब कुटुंबांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर या घटकांना तातडीने विशेष आर्थिक मदत, रोजगार आणि जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांनी तहसीलदार, चिखली यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०२६ मध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाचा परिणाम केवळ जमीनधारक शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसून भूमिहीन शेतमजूर, रोजंदारी कामगार आणि बेरोजगारांवरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. भूमिहीन मजुरांकडे शेतीची जमीन नसल्याने त्यांना पीक नुकसानभरपाई अथवा शेतीशी संबंधित अनेक योजनांचा थेट लाभ मिळत नाही. त्यातच शेतीची कामे कमी झाल्याने रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर भूमिहीन व अत्यल्प उत्पन्न असलेल्या मजूर कुटुंबांना किमान ९५ हजार रुपयांची विशेष आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच चिखली तालुक्यातील प्रत्येक गावात मागणी करणाऱ्या पात्र मजुरांना तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत, कामांचे निकष शिथिल करून अधिक कामे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. भूमिहीन शेतमजूर, रोजंदारी मजूर व अत्यल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी स्वतंत्र दुष्काळी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत नियमित व पुरेशा प्रमाणात धान्य मिळावे, दुष्काळी गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा स्वतंत्र आराखडा तयार करावा तसेच पशुधनासाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था करावी, असेही निवेदनात नमूद आहे. मोफत अथवा सवलतीच्या दरात चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा छावण्या किंवा अन्य प्रभावी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जलसंधारणाच्या कामांना रोजगार हमीशी जोडण्याची मागणी
रोजगार हमीच्या माध्यमातून नाला खोलीकरण, बंधारे, जलसंधारण, मृदसंधारण, वृक्षलागवड, रस्ते आदी ग्रामीण विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे मजुरांना रोजगार मिळेल, तर दुसरीकडे गावांमध्ये जलसंधारणाची कामे होऊन भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करता येतील, असे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार व स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभियान राबवावे. तसेच शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ देताना जात, धर्म, पक्ष किंवा अन्य कोणत्याही आधारावर भेदभाव न करता शासनाच्या निकषांनुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
चिखली तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा स्वतंत्र आढावा घेण्यासाठी विशेष दुष्काळ आढावा बैठक घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजनांचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
भूमिहीन शेतमजूर, गरीब कुटुंबे, बेरोजगार युवक आणि दुष्काळग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आर्थिक मदत, रोजगार, अन्नधान्य, पाणी व चारा उपलब्ध करून द्यावा आणि निवेदनावर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिवाजी शिराळे पाटील यांनी व्यक्त केली आहे. यावेळी शिवाजी किसनराव शिराळे

मनोज लाहोरकर शिवसेना नेते अनिल भाऊ जाधव उपतालुकाप्रमुख, राजेंद्र लहाने शिवसेना नेते ,रवींद्र काकडे,अमरदादा सुसर उपशहर प्रमुख , विनोद भाऊ वानरे उपशहर प्रमुख,अमर काळे उपशहर प्रमुख ,अभिजीत वीर उपशहर प्रमुख, योगेश गवळी, अनिल खरात, संघर्ष तरकसे, राजूभाऊ साळवे, सचिन गवई, देवानंद वतारी, ठेग भाऊ, शुभम जाधव,आदी प्रामुख्याने उपस्थित होते






