Home / Uncategorized / गणरायाच्या निरोपासाठी सावळदबारात भक्तांचा जल्लोष!

गणरायाच्या निरोपासाठी सावळदबारात भक्तांचा जल्लोष!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

चार ते पाच गणेश मंडळांच्या मिरवणुकीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; फर्दापूर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात विसर्जन सोहळा शांततेत

सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात पार पडला. गावातील चार ते पाच गणेश मंडळांच्या वतीने गणेशमूर्तींच्या मिरवणुका काढण्यात आल्या. गणरायाला निरोप देण्यासाठी महिला, पुरुष, युवक, बालकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

गणेशमूर्तींच्या मिरवणुकीत मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी चौका चौकात नागरिकांनी गणरायाचे दर्शन घेतले. भक्तिभावाने आणि उत्साहात गणेशभक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. मिरवणुकीदरम्यान ग्रामस्थांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिला व बालकांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तीनही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वय साधत सहकार्य केले. त्यामुळे मिरवणूक नियोजनबद्ध पद्धतीने पुढे सरकली आणि विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.

फर्दापूर पोलिसांचा चोख बंदोबस्त

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सावळदबारा पोलीस चौकीच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मिरखा तडवी व पोलीस अंमलदार शिवदास गोपाळ यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. त्यांना होमगार्ड जवानांनी सहकार्य केले.

मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस व होमगार्ड जवान तैनात करण्यात आल्याने संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली. ग्रामस्थांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सुव्यवस्था राखली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

अखेर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या विसर्जन सोहळ्याने सावळदबारातील गणेशोत्सवाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार