Home / Uncategorized / पावसाने ओढ दिल्याने पिकांची चिंता; सोयगाव कृषी विभाग बांधावर…

पावसाने ओढ दिल्याने पिकांची चिंता; सोयगाव कृषी विभाग बांधावर…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यात १०९ टक्के पाऊस; कापूस, मका, सोयाबीन पिकांवर परिणाम — क्षेत्रीय अधिकारी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन

सोयगाव : तालुक्यात यंदा पावसाच्या सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांची वाढ चांगली झाली; मात्र सध्या पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी व मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.

सोयगाव तालुक्यात एकूण ४२ हजार ६१५ हेक्टर लागवडीलायक क्षेत्र असून यंदा त्यापैकी ४२ हजार ४८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कापूस, मका आणि सोयाबीन या प्रमुख पिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तालुक्यात २८ हजार २०६ हेक्टर क्षेत्रावर कापूस, ६ हजार ६९३ हेक्टरवर मका तर ४ हजार २५८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. याशिवाय फळबाग तसेच इतर पिकांचीही लागवड करण्यात आली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सोयगाव तालुक्यात आजअखेर सरासरीच्या १०९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण वेगवेगळे आहे. जरंडी महसूल मंडळात सरासरीच्या १३९ टक्के, सोयगाव मंडळात १३४ टक्के, बनोटी मंडळात ८८ टक्के तर सावळदबारा महसूल मंडळात ८१ टक्के पाऊस झाला असल्याने डाभा, मोलखेडा, फर्दापूर, धनवट व देव्हारी या परिसरात सोयगाव कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अधिकारी बावसकर मडम, बेबीचंद चौरे, अर्जुन सूरडकर व धनश्री व्यवहारे मॅडम यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सखोल असे मार्गदर्शन केले आहे.

महिनानिहाय पावसात मोठी तफावत

महिनानिहाय पावसाची आकडेवारी पाहता जून महिन्यात तालुक्यात सरासरीच्या १०० टक्के, जुलै महिन्यात तब्बल १९७ टक्के, ऑगस्ट महिन्यात ५५ टक्के, तर सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत केवळ ३४ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात झालेल्या चांगल्या पावसामुळे पिकांना मिळालेला आधार सध्या कमी होताना दिसत आहे.

कापूस, मका, सोयाबीनवर परिणाम

सध्याच्या पिकांच्या अवस्थेत पावसाची गरज असताना पावसाने ओढ दिल्याने कापूस पिकातील फुलपातीवर परिणाम, मक्याच्या कणसाच्या वाढीवर परिणाम, तर सोयाबीनमध्ये शेंगांची वाढ व दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या उत्पादनाबाबत चिंता निर्माण झाली आहे.

पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन सोयगाव कृषी विभागातील क्षेत्रीय कृषी अधिकारी व कर्मचारी गावोगावी तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी करीत आहेत. पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा, पावसाचे प्रमाण आणि पिकांची गरज यानुसार शेतकऱ्यांना आवश्यक कृषी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी पिकांमध्ये कोणतीही समस्या आढळल्यास जवळच्या सोयगाव कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी केले आहे.तसेच स्वतःहून कोणत्याही औषधांची फवारणी करण्याऐवजी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

— भारत अ. कासार, तालुका कृषी अधिकारी, सोयगाव,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार