छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
प्रभात फेरीतून स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला उजाळा; प्रा. विजय राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण
सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढत स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.
प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत गावातील नागरिकांमध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाबाबत जनजागृती केली. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बुलढाणा येथील प्रा. विजय सिंह राजपूत यांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासकीय अधिकारी एन. आर. कोलते पाटील, संस्थेच्या सचिव रत्नाताई कोलते, संस्था अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील, प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. विजय सिंह राजपूत म्हणाले, “निधडी छाती, निःस्पृह बाणा, लववी ना मान; असा आमच्या मराठवाड्याचा आम्हास अभिमान.” मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ इतिहासातील एक दिवस नसून स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणा देणारा महत्त्वपूर्ण अध्याय आहे. या लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान भावी पिढीने सदैव स्मरणात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठवाड्याच्या मुक्तीसाठी झालेल्या संघर्षाची माहिती देण्यात आली. स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिवाजी सत्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






