सोयगाव तालुका प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन; नियमभंग करणाऱ्या पंपचालकांवर कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर, दि. ११ एप्रिल : जिल्ह्यातील सर्व पेट्रोल व डिझेल पंपांवर ग्राहकांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच पेट्रोलियम पदार्थांची विक्री, इंधनाचे अचूक मोजमाप आणि ग्राहक हक्कांशी संबंधित नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष अॅड. जावेद मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांची नियमित तपासणी होणे आवश्यक असून, संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका समितीने निवेदनातून मांडली.
पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृह, वाहनांमध्ये हवा भरण्याची सुविधा, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्रणा, अचूक इंधन मोजमाप, अद्ययावत पेट्रोल-डिझेल दरफलक तसेच तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. या सुविधा ग्राहकांना सहज दिसतील व वापरता येतील अशा पद्धतीने ठेवण्यात याव्यात, अशी मागणी समितीने केली.
दरफलक व इंधन मोजमापाची नियमित तपासणी करा
पेट्रोल व डिझेलचे दर ग्राहकांना स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी अद्ययावत स्वरूपात लावण्यात यावेत. तसेच इंधन वितरण यंत्रणेतून ग्राहकांना योग्य प्रमाणात इंधन मिळते की नाही, याची संबंधित विभागाने वेळोवेळी तपासणी करावी. इंधनाच्या मोजमापाबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्यांची तत्काळ दखल घेऊन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
पेट्रोल पंपांवरील ग्राहक सुविधांची माहिती दर्शनी भागात स्पष्ट फलकाद्वारे प्रदर्शित करावी. ग्राहकांना तक्रार नोंदविण्याची पद्धत, संबंधित अधिकाऱ्यांची माहिती तसेच आवश्यक संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचनाही समितीने केली.
नियमभंग करणाऱ्या पंपचालकांवर कारवाईची मागणी
ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून न देणाऱ्या तसेच इंधन मोजमाप, दरफलक किंवा अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंपचालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. केवळ कागदोपत्री तपासणी न करता प्रत्यक्ष पेट्रोल पंपांवर जाऊन सुविधांची पाहणी करावी, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल व डिझेल पंपांची विशेष तपासणी मोहीम राबवून ग्राहकांना शासनाच्या नियमानुसार सर्व सुविधा मिळत आहेत की नाहीत, याची प्रत्यक्ष पाहणी करावी. तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यास संबंधितांना आवश्यक सूचना देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
पदाधिकारी उपस्थित
यावेळी प्रदेश अध्यक्ष अमोल जैन, शहर उपाध्यक्ष (गॅस व इंधन) संतोष पंडित, राज्य सल्लागार शिवाजी मुंडे, शासकीय योजना सदस्य शोकत बेग, सदस्य विजय गोरे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. याबाबतची माहिती पत्रकार रहीम पठाण यांनी दिली.






