छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
सावळदबारापासून अवघ्या चार किलोमीटरवर असूनही मूलभूत सुविधांचा अभाव; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी
सोयगाव तालुक्यातील सावळदबारापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चारु तांडा-मूर्ती परिसरातील विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून तुलनेने जवळ असूनही या तांड्यात आजही रस्ते, नाल्या, पाणी निचरा, स्वच्छता तसेच वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या पुलासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चारु मूर्ती परिसरातील पुलाच्या कामाचे तब्बल तीन वेळा उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक वेळी नारळ फोडून काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात पुलाच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यास गावाचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होते. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, शेतकरी, महिला नदीला पूर आला आला की महिलांना अक्षरशः मुलांना खांद्यावर घेऊन दवाखान्यात जावे लागते अशा ग्रामस्थांना सहन करावा लागत असल्याचे प्रा ज्ञानेश्वर राठोड यांनी सांगितले आहे. पण पुलाच्या कामांचा शुभारंभ कधी होणार फक्त प्रत्येक पक्षाचा लोकप्रतिनिधी येतो आणि नारळ फोडून जातो डबल गावात येत नाही मुहूर्त कधी निघणार गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांचा अभाव, पाणी साचण्याची समस्या आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावाजवळील पुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना केवळ उद्घाटन आणि आश्वासनांपुरताच विकास मर्यादित राहिल्याची संतप्त भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
“सावळदबारापासून चार किलोमीटरवर असलेल्या चारु मुतीॅ तांड्याची अशी अवस्था असेल, तर दुर्गम ग्रामीण भागातील तांड्यांचा विकास कधी होणार?” असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रा ज्ञानेश्वर राठोड, चारु मुतीॅ यांनी उपस्थित केला आहे. चारु तांड्यासह सोयगाव तालुक्यातील सर्व तांड्यांच्या विकासाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच चारु मुतीॅ,तांड्यासह तालुक्यातील सर्व तांड्यांकडे निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही राठोड यांनी केली. प्रत्येक तांड्यातील नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता, नाली, पाणी निचरा आणि सुरक्षित वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष तांड्यांवर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्ष विकासकामे कधी सुरू होणार? पुलाचे तीनदा उद्घाटन होऊनही काम रखडण्यामागचे कारण काय? असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
चारु तांड्यासह सोयगाव तालुक्यातील सर्व तांड्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन आणि निवडून आलेले पदाधिकारी ठोस पाऊल कधी उचलणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






