Home / Uncategorized / फर्दापूर जि.प. गटात १२ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ; भाजप कार्यालयाचेही उद्घाटन..!

फर्दापूर जि.प. गटात १२ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ; भाजप कार्यालयाचेही उद्घाटन..!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

८ कोटींच्या ३३ के.व्ही. वीजवाहिनीपासून पाणी, रस्ते व सामाजिक सभागृहांच्या कामांना चालना; मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते कार्यक्रम

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर व फर्दापूर जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांना मोठी चालना देणाऱ्या विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच भारतीय जनता पार्टीच्या फर्दापूर येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दि.22/8/26 शनिवार रोजी मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न होणार आहे.तरी छत्रपती संभाजीनगर,सिल्लोड, सोयगाव, फर्दापूर व सावळदबारा परिसरातील नागरिकांनी व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त इद्रिसजी मुलतानी यांनी केले आहे.तब्बल १२ कोटी रुपयांच्या विकासकामांना सुरुवात होणार असल्याने फर्दापूरसह परिसरातील नागरिकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

फर्दापूर ते सावळदबारा दरम्यान ८ कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या ३३ के.व्ही. वीजवाहिनीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून शेतकरी, व्यावसायिक तसेच नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच फर्दापूर सर्कलमधील ७७ विद्युत रोहित्रे (डीपी) बसविण्याच्या कामालाही सुरुवात होणार आहे.

फर्दापूर गावातील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ, गावांतर्गत सिमेंट रस्ते व भूमिगत गटार योजनेची कामे तसेच दलित वस्ती आणि आदिवासी वस्तीत सामाजिक सभागृह उभारण्याच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी होणार आहे. त्यामुळे पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता आणि सामाजिक सुविधांच्या दृष्टीने फर्दापूर व परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.

या विकासकामांचा शुभारंभ बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि ऊर्जा, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे राहणार आहेत.

कार्यक्रमास सुहास सिरसाट, अविनाश पाटील गलांडे, जितेंद्र जैस्वाल, सचिन गड, मीनाक्षी किशोर पवार, बालाजी सोनटक्के, आमदार सांडू पाटील लोखंडे, अनिताताई झांबरे मोढे, पंचायत समिती सिल्लोडच्या सभापती अनिता सुरेश बनकर, सुरेश पाटील बनकर, ज्ञानेश्वर पाटील मोटे, पुष्पाताई काळे, सुनील पाटील मिरकर, संजय पाटील, भगवान पाटील आढेर, सुनील जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान, फर्दापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळाही यानिमित्ताने पार पडणार आहे. विकासकामांसोबतच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी या कार्यालयाची महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

विकासकामांमुळे नागरिकांना दिलासा

फर्दापूर जि.प. गटातील विविध विकासकामे प्रत्यक्ष मार्गी लागल्याने नागरिकांच्या पाणी, वीज, रस्ते आणि सामाजिक सुविधांशी संबंधित प्रश्नांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

विनीत : ईद्रिसभाऊ मुलतानी, राज्यमंत्री दर्जा तथा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र, सिल्लोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार