सिन्नर प्रतिनिधी | गोकुळसिंग राजपूत
सिन्नर;महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि तडजोड न करणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या धडाकेबाज प्रशासनशैलीमुळे जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. बीड जिल्ह्यातील ताडसोना या शेतकरी कुटुंबातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी 2005 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतरच्या दोन दशकांहून अधिक काळाच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरुद्धची कठोर भूमिका कायम ठेवली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या मुंढे यांनी सोलापूर, नागपूर, नाशिक, मुंबईसह विविध महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अतिक्रमण हटाव, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, परिवहन सेवा सुधारणा आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या कठोर कारवायांमुळे त्यांना “महाराष्ट्राचे सिंघम” अशी ओळख मिळाली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार बदल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले.
सध्या महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात अन्न व औषधांमधील भेसळीविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ, किराणा माल, औषधे, बेकरी उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, हॉटेल व्यवसाय तसेच इतर खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. भेसळ सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून थेट अटकेची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत.
या कठोर कारवाईमुळे राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्यास मदत होत आहे. भेसळमुक्त अन्नामुळे नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होऊन आजारांचे प्रमाण कमी होण्यास तसेच उपचार व औषधांवरील खर्चात बचत होण्यास मदत होईल, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमाला सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंढे यांच्या कार्यशैलीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून उल्लेखनीय कार्याबद्दल दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी तुकाराम मुंढे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी श्रीपाद चितळे आणि आबासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी मुंढे यांच्या प्रामाणिक, निर्भीड आणि लोकहिताच्या प्रशासनशैलीचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.






