Home / Uncategorized / गरिबीवर मात करत ऋषिकेशची पोलीस दलात भरारी…!

गरिबीवर मात करत ऋषिकेशची पोलीस दलात भरारी…!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत…

सावळदबारा येथील कष्टकरी कुटुंबातील युवकाची नाशिक पोलीस दलात निवड; 

गावातून वाजतगाजत भव्य मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण

सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील अत्यंत गरीब व कष्टकरी कुटुंबातील युवक ऋषिकेश गजानन खिरडकर याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नाशिक येथे पोलीस दलात भरती होण्याचे यश संपादन केले आहे. दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी त्याची पोलीस दलात भरती झाल्याची माहिती मिळताच सावळदबारा गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ऋषिकेशच्या या यशामुळे त्याने आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाचे आणि सोयगाव तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

ऋषिकेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सुमारे एक वर्षापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही कुटुंबातील सदस्यांनी खचून न जाता ऋषिकेशच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या भवितव्यासाठी मोठे कष्ट घेतले. त्याची आजी कस्तुराबाई नामदेव खिरडकर, आई रंजनाबाई गजानन खिरडकर, काका राजू नामदेव खिरडकर तसेच बहीण दिपाली गंगातिरे यांनी मेहनत-मजुरी करून त्याला शिक्षण दिले आणि पोलीस भरतीसाठी प्रोत्साहन दिले.

गरिबी, आर्थिक अडचणी आणि वडिलांचे निधन अशा अनेक संकटांना सामोरे जात ऋषिकेशने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने कठोर मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळविले. त्याच्या यशामागे कुटुंबीयांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा मोठा वाटा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ऋषिकेश पोलीस दलात भरती झाल्याची बातमी गावात पोहोचताच तरुण मित्रमंडळ व ग्रामस्थांनी एकत्र येत त्याचे जल्लोषात स्वागत केले. गावातून ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर तरुणांनी गुलालाची उधळण करत ऋषिकेशच्या यशाचा आनंद साजरा केला.

यावेळी उपसंपादक गोकुळसिंग राजपूत, महिला आघाडीच्या सोयगाव तालुका अध्यक्ष अलकाबाई राजपूत तसेच फौजी अनिल बाबू नप्ते यांच्या हस्ते ऋषिकेशचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्याला पोलीस दलातील पुढील सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि ध्येय निश्चित असेल तर यश मिळविता येते, हे ऋषिकेशने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. ग्रामीण व गरीब कुटुंबातील युवकांसाठी ऋषिकेशचे यश प्रेरणादायी ठरणार आहे.

या भव्य मिरवणुकीत तरुण मित्रमंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, नातेवाईक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ऋषिकेशच्या पोलीस दलातील निवडीमुळे सावळदबारा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार