छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर अवघ्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात; राज्यमंत्री दर्जा प्राप्त इद्रिसजी मुलतानी यांच्या प्रयत्नांना यश
सोयगाव : तालुक्यातील सावळदबारा परिसरातील रावळा ते पळसखेडा-टिटवी मार्गे जामठीला जोडणाऱ्या रस्त्याची तब्बल ४० वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत आदेश दिल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. राज्यमंत्री दर्जा प्राप्त तथा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
रावळा ते पळसखेडा, टिटवीमार्गे जामठीला जोडणारा हा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा प्रश्न प्रलंबित होता. रस्त्याअभावी या परिसरातील नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच चक्रधर स्वामी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
अखेर रस्त्याच्या कामातील अडथळे दूर झाल्यानंतर साफसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. यावेळी सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण, पंचायत समिती सदस्य, भाजपाचे युवा नेते राहुल राठोड, तालुका अध्यक्ष शांताराम खराटे, संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला.
नागरिकांच्या अडचणी दूर होणार
या रस्त्यामुळे रावळा, पळसखेडा, टिटवी आणि परिसरातील गावांना जामठीशी जोडणी मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः चक्रधर स्वामी मंदिराकडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमी अंतरातून प्रवास करता येणार असल्याने या मार्गाचा धार्मिक व सामाजिकदृष्ट्याही मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनाही शेतमालाची वाहतूक करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे
‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’
“”””””””परिसरातील नागरिकांच्या वतीने प्रा. जीवन कोलते पाटील यांनी इद्रिसजी मुलतानी यांच्या प्रयत्नांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी, “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. नेता असावा तर असा,” अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना वाहतुकीसाठी सुकर व सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
प्रा जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते तरुण मित्र मंडळ सावळदबारा ता सोयगाव






