छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
टिटवी-पळसखेडा-जामठी
रस्त्याच्या कामाला २० फेब्रुवारी २०२३ रोजीच मंजुरी; आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरातील टिटवी, पळसखेडा ते जामठी या मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था असून, या रस्त्याच्या कामाची नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पाठपुरावा करून रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. रावळा ते पळसखेडा-टिटवी या रस्त्याच्या कामाला २० फेब्रुवारी २०२३ रोजी मान्यता मिळाली असून, त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन, सीमांकन तसेच संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या व इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता लवकरच नागरिकांच्या वाहतुकीसाठी अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी, “रस्त्याच्या कामाचे श्रेय घेणाऱ्यांनी जनतेसमोर सत्य स्पष्ट करावे. या कामाला मंजुरी कधी मिळाली, त्यासाठी कोणी पाठपुरावा केला आणि शासनस्तरावर कोणत्या प्रक्रिया पार पडल्या, याची अधिकृत कागदपत्रेच वस्तुस्थिती स्पष्ट करतील,” असे म्हटल्याचे सांगण्यात आले.
रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुरू असलेल्या वृक्षतोड, रस्त्याची साफसफाई, जागेचे सीमांकन तसेच प्रत्यक्ष रस्ते बांधकामाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीबाबत माहिती घेऊन कामाची गुणवत्ता आणि गती याबाबतही सूचना करण्यात आल्या.
या रस्त्यामुळे सावळदबारा परिसरातील टिटवी, पळसखेडा, जामठी तसेच लगतच्या गावांतील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच रोजच्या कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याने रस्त्याचे काम पूर्ण होण्याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“श्रेयवादापेक्षा जनतेच्या विकासाला प्राधान्य हेच आमचे धोरण आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांची कामे मार्गी लावणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” अशी भूमिका आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केल्याची माहिती माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाआप्पा चोपडे यांनी दिली.
रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






