Home / Uncategorized / टिटवीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर प्रभात फेरी; विद्यार्थ्यांची देशभक्तीपर संगीत कवायत…

टिटवीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर प्रभात फेरी; विद्यार्थ्यांची देशभक्तीपर संगीत कवायत…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

टिटवी : सोयगाव तालुक्यातील टिटवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातून लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांची आकर्षक प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी केलेल्या आकर्षक संचलनाने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण समितीच्या अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा चैताली दीपक गौलखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर संगीत कवायत सादर केली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे शाळेचा परिसर उत्साहाने भारावून गेला होता.

शाळेला आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी संकलन करण्यात आले. शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

गावातील माजी विद्यार्थी तथा युवा उद्योजक शत्रुघ्न भाऊ दोडे यांनी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र समन्वयक शेख सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चांदणे सर यांनी केले. सूत्रसंचालन मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेमाणे, तेली, ज्ञानेश्वर मख, बाजूलगे सर यांनी परिश्रम घेतले. शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार