Home / Uncategorized / रस्ता सरकारी… पण जबाबदारी कोणाची?” ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’च्या घोषणेला बाजारपेठेत हरताळ; कचऱ्यामुळे रोगराईचा धोका…

रस्ता सरकारी… पण जबाबदारी कोणाची?” ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’च्या घोषणेला बाजारपेठेत हरताळ; कचऱ्यामुळे रोगराईचा धोका…

चिखली | प्रतिनिधी :

“स्वच्छ चिखली, सुंदर चिखली” हा नारा नगरपरिषद सातत्याने देत आहे. स्वच्छतेसाठी कर्मचारी, यंत्रणा, कचरा संकलन वाहने आणि जनजागृतीवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, या सर्व प्रयत्नांवर काही बेजबाबदार नागरिक आणि व्यावसायिक अक्षरशः पाणी फेरत असल्याचे चित्र शहराच्या मुख्य बाजारपेठेत दिसून येत आहे.

मुख्य बाजारपेठेत भाजीपाला विक्रीनंतर उरलेला कचरा, कुजलेल्या भाज्या, प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर टाकाऊ वस्तू थेट रस्त्यावर फेकल्या जात आहेत. विशेष म्हणजे, नगरपरिषदेचा कचरा संकलन ट्रॅक्टर नियमित येत असतानाही काही विक्रेते कचरा त्यामध्ये न टाकता रस्त्यावरच टाकण्यास प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या कचऱ्यावर भटक्या जनावरांचा वावर वाढला असून, अन्नाच्या शोधात ती प्लास्टिकसह इतर घातक कचरा खात आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याबरोबरच अनेकदा त्यांचा जीवही धोक्यात येत असल्याचे पशुप्रेमींकडून सांगितले जाते. त्यामुळे कचरा व्यवस्थापनासोबतच मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

पावसाळ्यामुळे साचलेल्या कचऱ्यातून दुर्गंधी पसरत असून डास, माशा आणि इतर कीटकांची संख्या वाढली आहे. परिणामी, संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याहून चिंताजनक बाब म्हणजे, रस्त्यावर कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या जागरूक नागरिकांनाच काही जण उद्धटपणे उत्तर देतात. “रस्ता काही कुणाच्या बापाचा नाही… सरकारी आहे,” अशी भाषा वापरत सार्वजनिक ठिकाणालाच कचरा डेपो समजण्याची मानसिकता वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अशीच परिस्थिती शहरातील चिकन मार्केट परिसरातही असून, मांस व इतर टाकाऊ कचऱ्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरते. या मार्गावरून ये-जा करणारे नागरिक, महिला, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नगरपरिषद स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न करत असली, तरी स्वच्छ शहर घडविण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच व्यापारी संघटना, बाजार समिती आणि नागरिकांनीही स्वच्छतेची सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.

रस्ते सरकारचे असतील, पण शहर आपलेच आहे. स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली, तरच “स्वच्छ चिखली, सुंदर चिखली” हा नारा प्रत्यक्षात साकार होईल, असे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार