Home / Uncategorized / चिंतातुर शेतकरी’ कविता संग्रह स्वामी परमानंदगिरीजी महाराजांना भेट…

चिंतातुर शेतकरी’ कविता संग्रह स्वामी परमानंदगिरीजी महाराजांना भेट…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

शेतकरी जीवनातील व्यथा, समस्या आणि संघर्षाचे वास्तव कवितेतून मांडणाऱ्या संग्रहाचे कौतुक

वैजापूर, दि. १२ : शेतकरी जीवनातील सुख-दुःख, व्यथा, अडचणी, संघर्ष आणि शेतीशी निगडित विविध प्रश्नांवर आधारित ११२ कवितांचा ‘चिंतातुर शेतकरी’ हा कविता संग्रह कवी धोंडीरामसिंह राजपूत यांनी भांगसी माता गड येथील श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांना भेट म्हणून प्रदान केला.

संतश्रेष्ठ संत सावता महाराज यांच्या ७३१व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. ११) हा पुस्तक भेटीचा कार्यक्रम पार पडला. संत सावता महाराज यांनी शेती, कष्ट आणि श्रम यामध्येच विठ्ठलाचे दर्शन मानले. शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि श्रमाला अध्यात्मिक महत्त्व देणाऱ्या संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शेतकरी जीवनावर आधारित कविता संग्रह स्वामीजींना अर्पण करण्यात आला.

‘चिंतातुर शेतकरी’ या संग्रहातून शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव परिस्थिती, नैसर्गिक संकटे, शेतीतील वाढता खर्च, उत्पादनाला मिळणारा भाव, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच शेतकऱ्यांच्या मनातील चिंता आणि अपेक्षा यांना कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आले आहे. ग्रामीण जीवनाशी जवळीक असलेल्या या कवितांमधून शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या जगण्याचा संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

कवी धोंडीरामसिंह राजपूत यांनी शेतकरी हा समाजाच्या अन्नसाखळीचा प्रमुख आधार असून त्याच्या कष्टाची आणि समस्यांची समाजाने जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. संत सावता महाराजांच्या विचारांना अभिवादन म्हणून त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा कविता संग्रह स्वामी परमानंदगिरीजी महाराजांना भेट देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 भांगसी माता गड येथील श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांना ‘चिंतातुर शेतकरी’ कविता संग्रह भेट देताना कवी धोंडीरामसिंह राजपूत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार