छ. संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने अत्यंत नियोजनबद्ध आणि ऐतिहासिक पद्धतीने प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. भाजपा जिल्हा परिषद फर्दापूर गटाचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार मा. माहीन इद्रिस मुलतानी, पंचायत समिती फर्दापूर गणाचे अधिकृत उमेदवार राहुल अंकुश राठोड तसेच पंचायत समिती सावळदबारा गणाचे उमेदवार उत्तम महारु चव्हाण यांच्या प्रचाराची सुरुवात दि. २५ जानेवारी २०२६ रोजी चक्रधर स्वामी मंदिर येथे श्रीफळ फोडून करण्यात आली.
या शुभारंभप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते प्रा. जीवन कोलते पाटील यांनी माहिती दिली की, मतदारांनी कमळ निशाणीसमोरील बटन दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले.
विशेष म्हणजे, यावेळी केवळ एका ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्याऐवजी, संपूर्ण सर्कलमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी आणि प्रत्येक गावात स्थानिक नेतृत्वाच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. हे भाजपाच्या संघटनात्मक ताकदीचे आणि प्रभावी नियोजनाचे ठळक उदाहरण असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे.
याच मोहिमेचा भाग म्हणून सावळदबारा येथे अत्यंत उत्साहात प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. जरी जिल्हा परिषद उमेदवार माहीन मुलतानी व पंचायत समिती उमेदवार उत्तम चव्हाण देव्हारी हे प्रत्यक्ष उपस्थित नसले, तरी त्यांच्या अनुपस्थितीत स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली.
या प्रचाराची सुरुवात मंदिर, दर्गा अशा सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर नारळ फोडून करण्यात आली. यामुळे सामाजिक सलोखा, एकतेचा संदेश देण्यात आला. गावोगावी उमेदवारांच्या पाठीशी उभे असलेले कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे आणि जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजपाची ताकद अधिक ठळकपणे समोर आली.
उपस्थित कार्यकर्त्यांमधील उत्साह, निर्धार आणि ‘एक वेळ, एकच ध्येय – विजय!’ ही भावना पाहता, फर्दापूर व सावळदबारा गणात भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास यावेळी प्रा जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केला आहे.






