Home / Uncategorized / १ ऑगस्टपासून केंद्र सरकारचा नवा नियम लागू; ३० दिवसांपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवण्यास निर्बंध…

१ ऑगस्टपासून केंद्र सरकारचा नवा नियम लागू; ३० दिवसांपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवण्यास निर्बंध…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

साखरेचा कृत्रिम तुटवडा व दरवाढ रोखण्यासाठी निर्णय; व्यापाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे – दत्तात्रय गोसावी

सिन्नर : देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये तसेच ग्राहकांना योग्य दरात साखर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने १ ऑगस्टपासून साखर साठवणुकीसंदर्भात नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार घाऊक व्यापाऱ्यांना ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा साखरेचा साठा ठेवता येणार नसल्याची माहिती बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी दिली.

गोसावी यांनी सांगितले की, काही व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा करून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे साखरेच्या किमती वाढून सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने साठा मर्यादेचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

या नव्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आवश्यक वस्तू कायदा व संबंधित नियमांनुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे सर्व घाऊक व्यापारी, वितरक आणि साखर व्यवसायाशी संबंधितांनी शासनाच्या आदेशांचे पालन करावे तसेच आपल्या साठ्याची नोंद अद्ययावत ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारच्या या निर्णयामुळे साखरेचा पुरवठा अधिक पारदर्शक राहण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांना योग्य दरात साखर उपलब्ध होऊन बाजारातील अनावश्यक दरवाढीवर नियंत्रण मिळविण्यास हातभार लागेल, असा विश्वास दत्तात्रय गोसावी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार