छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
शाहिरी, समाजपरिवर्तन आणि स्वराज्याच्या विचारांचा विद्यार्थ्यांना दिला प्रेरणादायी संदेश
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा, येथील जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय, सावळदबारा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात संस्थाध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व उपस्थित संचालक मंडळाच्या हस्ते साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच संस्था प्रशासकीय अधिकारी एन. आर. कोलते यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य जीवन कोलते पाटील,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी महान विभूतींना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर खमाट यांनी केले. विद्यार्थ्यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर मनोगते व्यक्त करत त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा उलगडून सांगितला.
प्रभारी प्राचार्य जीवन कोलते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी, साहित्य आणि लोककलेच्या माध्यमातून शोषित, वंचित व कष्टकरी समाजाला आत्मविश्वास व संघर्षाची प्रेरणा दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातील त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी आहे. ‘जग बदलू घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ हा त्यांचा संदेश समाजपरिवर्तनासाठी आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचाही आढावा घेण्यात आला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” या त्यांच्या घोषणेने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाल्याचे वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास विकास पाटील, भास्कर खमाट, मुकुंदा व्यवहारे, ज्ञानेश्वर राठोड, पोपटराव सोनवणे, भूषण देसले, दिलीप सिसोदे, मनोहर पडोळ, गणेश मोहने, सुनील चव्हाण, दिलीप कोळी, गणेश सत्रे, योगेश राठोड, प्रदीप पाटील, मोहन बोरे, सतीश खवले, शिवाजी सत्रे, अजबराव चव्हाण, श्याम जाधव, बाबासाहेब कोलते, गजानन चव्हाण, संदीप कोलते यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती राहुल बडक यांनी दिली.






