चिखली : प्रतिनिधी
तालुक्यातील पळसखेड दौलत शिवारात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच चिखली पोलिसांसह बुलढाणा वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अनेक तास चाललेल्या शर्थीच्या संयुक्त मोहिमेनंतर अखेर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आले.
बिबट्या शिवारात फिरत असल्याची माहिती मिळताच पीएसआय चव्हाण, पीएसआय अश्विनी गाडे, हेड कॉन्स्टेबल जनार्धन इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश मापारी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सावळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील केसकर आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल वायाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी सुरू केली. यावेळी पोलीस मित्र सोहेल यांनीही पोलिसांना महत्त्वाची मदत करत परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी सहकार्य केले. दुसरीकडे बुलढाणा वन विभागानेही तत्काळ यंत्रणा सक्रिय करत वनपाल बकाल, वनरक्षक आबासाहेब
वायाळ, वनरक्षक आकाश शिंदे तसेच रेस्क्यू टीमचे संदीप मडावी आणि अमोल चव्हाण यांना घटनास्थळी पाचारण केले.
पोलिस आणि वन विभागाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत रेस्क्यू पथकाने काळजीपूर्वक सापळा रचला. काही काळ चाललेल्या या थरारक शोधमोहीमेनंतर बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात यश
आले. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने बिबट्याला आपल्या ताब्यात घेत पुढील वैद्यकीय तपासणी व नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या प्रक्रियेसाठी वनविभागाकडे हलविले.
दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विठ्ठला सुरक्षितपणे पकडल्यामुळे नागरिकांनी पोलीस व वनविभागाचे आभार व्यक्त केले






