Home / Uncategorized / सावळदबारात पावसासाठी महिलांचे श्रीचक्रधर स्वामींच्या चरणी साकडे; धोंडी घालून पर्जन्याची प्रार्थना..!

सावळदबारात पावसासाठी महिलांचे श्रीचक्रधर स्वामींच्या चरणी साकडे; धोंडी घालून पर्जन्याची प्रार्थना..!

 छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

उन्हाच्या तडाख्याने सोयाबीन, कापूस व मका पिके करपली; दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांमध्ये चिंता

सोयगाव, ता. २१ :

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सततच्या उष्णतेमुळे सोयाबीन, कापूस व मका पिके करपू लागली असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही अद्याप पीक उगवले नसल्याने सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी मंगळवारी (दि. २१ जुलै) पारंपरिक पद्धतीने भगवान श्रीचक्रधर स्वामींच्या चरणी पावसासाठी साकडे घालत धोंडीचा धार्मिक विधी केला.

श्रीचक्रधर स्वामी मंदिराच्या अध्यक्षा पुष्पाबाई गोपीनाथ पुजारी,अलकाबाई राजपूत यांच्या पुढाकाराने गावातील मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या. येथील ३३ केव्ही महावितरण उपकेंद्राजवळून महिलांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन सुमारे एक किलोमीटरची पदयात्रा करत श्रीचक्रधर स्वामी मंदिर गाठले. मंदिरात भगवान श्रीचक्रधर स्वामींना जलाभिषेक करून परिसरात लवकरात लवकर भरपूर पाऊस पडावा, शेतकऱ्यांचे संकट दूर व्हावे आणि उभी पिके वाचावीत, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

यानंतर महिलांनी पारंपरिक धोंडी घालत एकमेकींच्या अंगावर पाणी उडवत पर्जन्यदेवतेला साकडे घातले. धार्मिक श्रद्धा आणि लोकपरंपरेचे दर्शन घडविणारा हा उपक्रम गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भक्तिमय वातावरणात पार पडला. महिलांनी भजन, नामस्मरण आणि जयघोष करत संपूर्ण गावात पावसासाठी प्रार्थना केली.

सावळदबारा परिसरात यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सोयाबीन, कापूस व मक्याची कोवळी रोपे उन्हामुळे करपली असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. दुबार पेरणीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वेळेत चांगला पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यावेळी गावातील महिला, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या या अनोख्या धार्मिक उपक्रमाची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार