Home / Uncategorized / मातृतीर्थ सिंदखेडराजात स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशास भावपूर्ण श्रद्धांजली

मातृतीर्थ सिंदखेडराजात स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशास भावपूर्ण श्रद्धांजली

देऊळगाव राजा : मुन्ना ठाकूर 

असं नेतृत्व पुन्हा होणं नाही’ – नागरिकांची भावना

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मस्थानासमोर आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन पार पडले. यावेळी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव, नागरिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकवृंद यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

स्व. अजितदादा पवार यांच्या जाण्याने केवळ एका पक्षाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक व भावनिक स्तरावर अपूरणीय नुकसान झाले आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. दादांच्या नेतृत्वाची उंची, प्रशासनावरची पकड आणि जनतेवरील विश्वास यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

मातृतीर्थ सिंदखेडराजा व स्व. अजितदादा पवार यांचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे होते. सन २०२२ मध्ये त्यांनी सिंदखेडराजा येथे तब्बल सात तास ऐतिहासिक स्थळांचा सखोल अभ्यास करून विकास आराखड्यासाठी बैठका घेतल्या होत्या. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे या ऐतिहासिक नगरीच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार होती; मात्र त्यांच्या अकाली जाण्याने हा विकास थांबल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी बुलढाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी केली. ही मागणी म्हणजे त्यांच्या जनसेवेप्रती दिलेली खरी मानवंदना असल्याचे मत व्यक्त झाले.

लहान विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या “अजितदादा अमर रहे” या घोषणांनी परिसर भावनांनी भारावून गेला.

याप्रसंगी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नरेश शेळके, इरफान अली, नगराध्यक्ष सौरभ तायडे, देविदास ठाकरे, विजय तायडे, डॉ. सुनील कायंदे, निलेश ठाकरे, ॲड. संदीप मेहेत्रे, उमेश खरात, नितीन शेळके पाटील, सागर मेहेत्रे, प्रवीण गीते यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा उजाळा देत त्यांच्या नेतृत्वाचे स्मरण केले.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांत हा पवित्र अस्थिकलश दर्शनासाठी नेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार