जामनेर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
फत्तेपूर विद्यालयातील गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; सागर देठे यांच्याकडून गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांचा गौरव
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३६ गावांमधील शाळकरी मुली, महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच विविध अभ्यासक्रमांसाठी येणाऱ्या तरुणींना रोडरोमिओ किंवा टवाळखोरांकडून त्रास होत असल्यास त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पोलीस ठाण्यात किंवा थेट माझ्याकडे तक्रार करावी. अशा प्रकारच्या तक्रारींवर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी दिला.
फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व बक्षीस वितरण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, महाविद्यालय परिसर, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे आणि पर्यटनस्थळांवर टवाळखोर व रोडरोमिओंवर विशेष पोलीस पथकाद्वारे कारवाईचे अभियान राबविण्यात येणार आहे. मुलींची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सध्या तेलंगणा राज्यात सहाय्यक कॉर्पोरेट संचालक पदावर कार्यरत असलेले सागर शामराव देठे यांच्या सामाजिक कार्याचाही गौरव करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केलेल्या सागर देठे यांनी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी आर्थिक स्वरूपात बक्षिसे देण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे. यावर्षीही त्यांच्या वतीने गुणवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला शामराव देठे, पत्रकार सलीम पटेल, अभयसिंह राजपूत, मुख्याध्यापक डी. आर. माळी, पंकज चोपडे, उपमुख्याध्यापक पी. एम. पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.






